पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ३५ मिनिटे फोनवर चर्चा केली. या चर्चेत मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना भारताने लक्ष्य करत केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने युद्धविरामाला मान्यता दिल्याचे मोदींनी सांगितले, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.

मिस्त्री यांनी सांगितले, “जी-७ शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट होणार होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेत परतावे लागले आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विनंतीवरून आज दोन्ही नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. ते पुढे म्हणाले, दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ ३५ मिनिटे चर्चा झाली.

जी-७ शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट होणार होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेत परतावे लागले आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि दहशतवादविरोधातील लढाईत पाठिंबा दर्शवला होता. तेव्हापासून आता दोन्ही नेत्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा केली,” अशी माहिती मिस्त्री यांनी दिली. चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारताच्या कठोर भूमिकेचा उल्लेख केला आणि जम्मू-काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नव्हती, यापुढेही कधीच स्वीकारणार नाही, असेही स्पष्ट केले.

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच सविस्तर चर्चा होती. हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून संवेदना व्यक्त केला होत्या आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपला पाठिंबा जाहीर केला होता. फोन कॉलदरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहलगामनंतर भारताने दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपला निर्धार जगासमोर दाखवून दिला आहे. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, ६ आणि ७ मेच्या रात्री भारताने फक्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.

पाकिस्तानच्या विनंतीवरून शस्त्रविराम

९ मेच्या रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून इशारा दिला होता की, पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते की जर असा हल्ला झाला तर भारत आणखी ताकदीने प्रत्युत्तर देईल. मोदींनी ट्रम्प यांना सांगितले, ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानी हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले आणि पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ निकामी केले. संघर्षादरम्यान कोणतीही चर्चा झाली नाही, असे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले.

ते म्हणाले, या घटनाक्रमादरम्यान कधीही भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अमेरिकेच्या मध्यस्थीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी यावर भर दिला की, लष्करी हालचाली कमी करण्यासाठी ही चर्चा सध्याच्या संपर्क माध्यमांद्वारे थेट भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात झाली आणि चर्चा केवळ पाकिस्तानच्या विनंतीवरूनच झाली. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारताने काश्मीर मुद्द्यावर कधीही मध्यस्थी स्वीकारली नव्हती आणि कधीही स्वीकारणार नाही. त्यांनी सांगितले की, या विषयावर भारतात सर्वांचे राजकीय एकमत आहे.

अमेरिकेचा दहशतवादाविरोधात भारताच्या लढाईला पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेले सविस्तर स्पष्टीकरण मान्य केले आणि ते समजून घेतले. मुख्य म्हणजे त्यांनी दहशतवादाविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढाईला पाठिंबा दर्शविला. पंतप्रधान मोदी यांनी अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प यांना भारत भेटीची इच्छा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना कॅनडाहून परतल्यावर तुम्हाला अमेरिकेत थांबता येईल का असे विचारले. मात्र, पंतप्रधान मोदींनी तसे शक्य नसल्याचे सांगितले. दोन्ही नेते भविष्यात भेटण्याचा प्रयत्न करण्याविषयी बोलले. त्यांनी इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षाबाबत दोघांनीही सहमती दर्शवली की शांतता साध्य करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये थेट चर्चा आवश्यक आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत. ट्रम्प आणि मोदींनी इंडो-पॅसिफिक प्रदेशाबद्दल त्यांचा दृष्टिकोन मांडला आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यात क्वाडच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला पाठिंबा दर्शविला. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना पुढील क्वाड बैठकीसाठी भारत भेटीचे आमंत्रण दिले, त्यावर ते भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.