Cabinet Committee of Political Affairs : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे बैठकाचे सत्र सुरू असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपर कॅबिनेट बोलाविली. आज कॅबिनेट कमिटी ऑफ पॉलिटिकल अफेअर्स (CCPA) ही बैठक होणार झाली. कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (CCS) बैठकीनंतर आज ही महत्त्वाची बैठक झाल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीच्या पहिल्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी केली होती. यामध्ये सिंधु जल करार रद्द करणे, पाकिस्तानातील नागरिकांचा व्हिसा रद्द करणे, पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना परत बोलावणे, अटारी सीमा बंद करणे आदी निर्णय घेण्यात आले होते. तसंच, काल (२९ एप्रिल) झालेल्या संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीमध्ये दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट व थेट संदेश मोदींनी दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, आजच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.

पुलवामा हल्ल्यावेळी झाली होती शेवटची बैठक

२०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात रणनीती आखण्यासाठी सीसीपीएची शेवटची बैठक झाली होती. या बैठकीत पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. नंतर, २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ला केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

CCPA चे कार्य

  • सीसीपीए देशाच्या महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक बाबींचा आढावा घेते, निर्णय घेते आणि महत्त्वाच्या प्रसंगी बैठका घेते.
  • सीसीपीए प्रामुख्याने केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचा विचार करते.
  • राजकीय परिणाम असलेल्या आर्थिक धोरणांवर आणि अंतर्गत सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात.
  • तसेच दूरगामी राजकीय परिणाम असलेल्या मुद्द्यांवर विविध मंत्रालयांमध्ये समन्वय साधण्यास मदत होते.
  • याशिवाय, सीसीपीए देशाच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करते आणि निर्णय घेते.

सीसीपीएचे सदस्य

सीसीपीएचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्ष असतील. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू, एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी, जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, महिला आणि बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांचा समावेश आहे. मित्रपक्षांच्या कॅबिनेट मंत्र्यांनाही सीसीपीएमध्ये स्थान देण्यात आले आहे.