आसाराम लोमटे

लोकप्रतिनिधी आहात तर तसेच जबाबदारीने वागा असे सुनावतानाच यापुढे तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिला. भाजप आणि रासप हे महायुतीतील मित्रपक्ष असले तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही पक्ष मात्र सध्या आमने-सामने आहेत. एवढेच नाही तर येणाऱ्या निवडणुकीत रासपच्या वाट्याची ही जागा भाजपकडे घेण्याची मोर्चेबांधणी गेल्या वर्षभरापासून सुरू झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

गंगाखेड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्तएका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माधवराव फड, माजी आमदार मोहन फड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मुरकुटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा… विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात भाजपाच्या सभा; आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू

गुट्टे यांनी आपल्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. खोट्या प्रकरणात अडकवून बदनामीचा घाट घातला गेला. माझ्यासारख्याला एवढा त्रास होत आहे तर सामान्यांचे काय असा प्रश्न या कार्यक्रमात मुरकुटे यांनी उपस्थित केला. यापुढे ‘बघून घेतो, आडवे करतो’ ही भाषा खपवून घेतली जाणार नाही. ही दादागिरी संपविण्यासाठीच आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड मतदारसंघातून मैदानात राहणार असल्याचे मुरकुटे म्हणाले. भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी आमदार गुट्टे यांच्यावर यावेळी शरसंधान केले.

सध्या गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत मात्र भाजपनेही आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य म्हणून पक्षात आधीच स्थान मिळवलेल्या संतोष मुरकुटे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही बाब भाजपच्या आगामी रणनीतीची पायाभरणी असल्याचे मानले जात आहे. गतवर्षी सुद्धा श्री. मुरकुटे यांच्या वाढदिवसाचा दणदणीत कार्यक्रम पार पडला त्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड या दोघांनीही उपस्थिती लावली होती. गतवर्षी या दोन्ही नेत्यांनी गंगाखेडची जागा भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्याचा शब्द तर मुरकुटे यांना दिलाच पण त्यांना ‘कामाला लागा’ असा संदेश देत या मतदारसंघात उद्याचा आमदार हा भाजपचा असेल असे वक्तव्य केले होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असलेल्या महादेव जानकर यांचे सध्या भारतीय जनता पक्षाशी अंतर पडत चालल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेडची जागा भाजपच्या वतीने पुढील निवडणुकीत रासपला सोडली जाण्याच्या शक्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या आठ- नऊ वर्षापासून आपण गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहोत. पक्षाने आपल्याला उमेदवारीची संधी दिल्यास कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवू असे यावेळी श्री. मुरकुटे यांनी घोषित केले आहे.

हेही वाचा… ओबीसी आंदोलनात शिंदे गटही सक्रिय,मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे महत्त्वाची जबाबदारी

पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ‘कमळ’ फुलविणार असल्याचे मुरकुटे यांनी जाहीर केले होते त्याचबरोबर गंगाखेड मतदारसंघात आता ‘रासप’चा विषय संपला, यापुढे गंगाखेडचा उमेदवार भाजपचा असेल असे मुरकुटे यांच्या समर्थकांनी जाहीर केले होते. त्यावर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिले होते. एकुणच भाजप व रासप या परस्परांचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांमध्येच सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसात गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला आहे. या निधीचे श्रेयही गुट्टे यांनी घेऊ नये. भाजपच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दिलेला हा निधी आहे याची आठवण गुट्टे यांना करून दिली जात आहे.

मूळचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याचा

मुळात युतीच्या गणितात गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला असायचा. २००४ च्या निवडणूकीत विठ्ठल गायकवाड हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. . तत्पूर्वी हा मतदारसंघ दीर्घकाळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होता. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव मधुन खुल्या प्रवर्गात बदलला. २०१९ मध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे या मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजप व रासप या दोन मित्रपक्षातला संघर्ष आता सुरु झाला आहे, तो पुढे कोणत्या वळणावर जातो याबाबत औत्सुक्य आहे.

Story img Loader