अलिबाग- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतांनाच, रायगड जिल्ह्यात महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमेकांविरोधीतल कुरघोड्या आणि फोडाफोडीला ऊत आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत तुझे माझे जमेनाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पालकमंत्रीपदावरून वादाची ठिणगी पडली, नंतर दोन्ही पक्षात फोडाफोडीला ऊत आला. टिकाटीप्पणीला सुरुवात झाली. या सर्व वादापासून भाजपने मात्र दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण आता भाजप शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी मधील धुसफूस समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

रोह्यातील डायलेसिस सेंटरच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडली. खासदार धैर्यशील पाटील यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. पाली नगराध्यक्षपद निवडणूकीत भाजपला नगराध्यक्षपद देऊन संबध सुधारण्याचे प्रयत्न केले. मात्र काही दिवसांनंतरच भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि भाजपचे खोपोली शहर प्रमुख राहूल जाधव यांना फोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. शिवसेनेच्या कर्जत विधानसभा सहसंपर्क प्रमुख असलेल्या सुनील पाटील यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने गळाला लावले. त्यामुळे शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात भाजपलाही सुंरग लावण्यास सुरवात केल्याची चर्चा सुरू झाली.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कर्जत, महाड आणि अलिबाग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटना बांधणीला सुरवात केल्याने, दोन्ही पक्षातील संबध टोकाचे ताणले गेले आहेत. त्यात आता शिवसेना भाजपमधील वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पक्षात नवीन आलेले लोक भाजपला हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी भाजपच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा पाटील यांना लक्ष करण्यास सुरवात केली आहे. चित्रा पाटील यांच्या कुर्डूस मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. चित्रा पाटील यांनी नुकताच शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये वादाला सुरुवात झाली आहे.

एकूणत राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीमधील तिन्ही पक्षात तुझे माझे जमेना पण सत्ते शिवाय करमेना अशी स्थिती पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जश्या जवळ येतील तसे हे वाद आणखिन वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे युती आघाडीचे गणित बसवितांना तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांची मनधरणी करणे हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.