Rahul Gandhi Lord Ram Controversy : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. इतकेच नाही, तर राहुल यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेदेखील सादर केले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. हे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वाद निर्माण झाला. भाजपानं या बॅनरवर आक्षेप घेतला असून, काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.

काँग्रेसच्या बॅनरवर नेमकं काय आहे?

गुरुवारी (२ ऑक्टोबर) संपूर्ण देशभरात विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या लखनऊ येथील कार्यालयाबाहेर विजयादशमीनिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना धनुष्यबाण धारण केलेल्या प्रभू श्रीरामाच्या रूपात, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मणाच्या रूपात दाखवण्यात आले. यावेळी दोघेही रावणाचा वध करताना दिसून आले. विशेष बाब म्हणजे बॅनरवरील रावणाच्या एका डोक्यावर ‘मतचोर’ असा उल्लेख करण्यात आलेला होता आणि इतर डोक्यांवर ईडी, भ्रष्टाचार, महागाई व निवडणूक आयोग अशी नावे लिहिलेली होती.

काँग्रेसच्या बॅनरमुळे भाजपाचा संताप

काँग्रेसने लावलेल्या या बॅनरवर भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराकडे पाठ फिरविणारे काँग्रेसचे नेते आता स्वत:ला रामाच्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याची खोचक टीका भाजपा नेत्यांनी केली. भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, “जे रामद्रोही आहेत, ज्यांना सनातन धर्माचा आदर करायचा माहीत नाही, जे रामाचे दर्शन घ्यायलाही अयोध्येत गेले नाहीत, ते आज स्वतःला रामाच्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हे अत्यंत दुःखद आहे. हिंदू देव-देवतांचा सातत्याने अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनता नक्कीच धडा शिकवणार.”

मोदींनी २०१४ मध्येच काँग्रेसरूपी रावणाचा वध केला : ब्रजेश पाठक

या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने आपल्या कार्यालयाबाहेर बॅनर लावून अत्यंत बेजबाबदार कृत्य केले आहे. राहुल गांधी यांची तुलना तुम्ही भगवान रामाशी कोणत्या आधारावर करीत आहात? हा हिंदू धर्माचा अपमान असून, काँग्रेसच्या नेत्यांनी ताबडतोब देशाची माफी मागायला हवी”, असे पाठक यांनी म्हटले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये काँग्रेसरूपी रावणाची १० मस्तके छाटून देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यामध्ये ७० वर्षांची लूट व भ्रष्टाचार, परिवारवादाची मुळे, कोळसा व टूजी घोटाळा, आणीबाणीतील काळा अध्याय, शीखविरोधी हिंसाचार, अर्थव्यवस्थेची झालेली दुर्दशा आणि देशाच्या सुरक्षेशी केलेला खेळ यांसारख्या गोष्टींचा समावेश होता”, अशी टीकाही ब्रजेश पाठक यांनी केली.

आणखी वाचा : Top Political News : रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान; जरांगेंचा मुंडेंना इशारा, फडणवीसांकडून ठाकरेंची खिल्ली; दिवसभरातील ५ घडामोडी

भाजपाच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

दरम्यान, काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर राहुल गांधी यांना प्रभू रामाच्या रूपात दाखविणारे हे बॅनर्स नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (NSUI) उपाध्यक्ष आर्यन मिश्रा यांनी लावले होते. या बॅनर्सवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. तुम्ही हिंदू धर्माचे एकमेव ठेकेदार नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील देशात रामराज्य आणण्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळेच या बॅनरवर त्यांना रामाच्या रूपात दाखवणे हे काही गैर नाही, अशा शब्दांत मिश्रा यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले.

“या बॅनरमध्ये राहुल गांधींना प्रभू श्रीराम व प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मण म्हणून दाखवणे योग्य आहे. द्वेष व भ्रष्टाचाराविरुद्ध लढून प्रत्यक्षात ‘रामाचे कार्य’ करणारे राहुल गांधीच आहेत. भाजपाचे नेते फक्त त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी रामाबद्दल बोलतात; पण त्यांच्या आदर्शांवर विश्वास ठेवत नाहीत. भाजपाचे नेते २०२४ नंतर हिंदू झाले आहेत. आम्ही पूर्वीही हिंदू होतो, आजही आहोत आणि यापूर्वीही राहू… आम्हाला हिंदू संस्कृती शिकविणारे ते कोण, असा प्रश्नही आर्यन मिश्रा यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा : RSS च्या मुशीतून घडलेल्या भाजपाच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; कोण आहेत अनिल जोशी?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी भाजपा नेत्यांना सुनावलं

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय मिश्रा यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधी यांचे बॅनरवर वापरण्यात आलेले चित्र हे प्रतीकात्मक स्वरूपाचे आहे. या बॅनरमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत. भाजपाचे नेते या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना नाहीत, तर कोट्यवधी जनतेच्या मनातही हेच आहे. देशात सध्या महागाई, भ्रष्टाचार व मतचोरी यांचे प्रमाण वाढले आहे. अशा विकारांनी त्रस्त झालेले तरुण राहुल गांधींकडे या सगळ्यांचा अंत करण्यासाठी आशेने पाहत आहेत. तरुणांच्या खऱ्या भावना समजून घेण्याऐवजी भाजपाकडून नेहमीप्रमाणेच नकारात्मकता आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे,” असे अजय मिश्रा यांनी म्हटले आहे.