मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या अवघ्या २० जागा तर राज ठाकरे यांच्या मनसेला खातेही उघडता न आल्याने पुन्हा मराठी माणसासाठी राज-उद्धव यांनी एकत्र यावे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे. भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गंभीर्याने पावलं टाकावी लागतील, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे तर त्यांनी साद घातल्यास राज ठाकरे निर्णय घेतील अशी पुस्ती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोडली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बहुतांश ठिकाणी राज ठाकरे यांचे उमेदवार उभे राहिले. मतविभागणीचा फटका मोठ्या प्रमाणावर या तिन्ही पक्षांना बसला. यामुळे आता मराठी माणसाची मते विभागू नयेत यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असा पर्याय समोर आणला जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी ज्या राजकीय पक्षांना मराठी माणसाबद्दल आस्था आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांना १०६ हुतात्म्यांचे बलिदान माहीत आहे. त्या सर्वांनी एकत्र बसून विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, मनसेला मानणारा मोठा वर्ग मराठी आहे. भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गांभीर्याने पावले टाकावी लागतील, असे राऊत म्हणाले. राज ठाकरे यांच्याविषयीच्या प्रश्नावर त्यांनी अशी भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> नवे सरकार स्थापन झाले की सामूहिक उपोषणाची तारीख; मनोज जरांगे यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर प्रकाश महाजन यांनी जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती, त्यांचे अस्तित्व पणाला लागले तेव्हा मनसेची गरज त्यांना वाटते, असे विधान केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही स्वत:हून साद यापूर्वी घातली होती. आता जर त्यांनी साद घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील, असे ते म्हणाले. समोरच्याची इच्छा काय आहे हे पाहिले जाईल. राज ठाकरे तर कधीही मैत्रीचा हात समोर करतात, असेही त्यांनी नमूद केले.