Prashant Kishor Income राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेले व जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सोमवारी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि ग्रामीण कार्यमंत्री अशोक चौधरी यांच्यावर आरोप केले आणि तत्काळ त्यांच्या अटकेची मागणी केली. पाटणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोप केले. त्यावेळी प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या उत्पन्नाबद्दलही मोठा खुलासा केला. “माझ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब आहे,” असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी आपल्या कमाईचा आकडा आणि स्रोतही उघड केला. ते नक्की काय म्हणाले? त्यांनी एनडीए नेत्यांवर काय आरोप केले? त्याविषयी जाणून घेऊयात…
प्रशांत किशोर यांनी एनडीए नेत्यांवर काय आरोप केले?
बिहारचे उपमुख्यमंत्री चौधरी यांना त्वरित पदावरून हटवण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी प्रशांत किशोर यांनी केली. किशोर यांनी १९९५ मधील तारापूर हत्याकांडात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप पुन्हा केला, ज्यात कुशवाहा समाजातील सात लोकांची हत्या झाली होती. घटनेच्या वेळी ते अल्पवयीन असल्याचे भासवण्यासाठी चौधरी यांनी बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा आरोपही किशोर यांनी केला.

त्याव्यतिरिक्त किशोर यांनी असाही प्रश्न विचारला की, १९९९ मध्ये झालेल्या दोन लोकांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सम्राट चौधरी यांची चौकशी झाली होती का? या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता, ज्याने नंतर या मृत्यूंना आत्महत्या ठरवले होते. या प्रकरणात कथित भूमिकेबद्दल चौधरी यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहनही किशोर यांनी केले. जनसुराज पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ चौधरी यांना बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेईल आणि ते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार आहेत.
भाजपाने या आरोपांवर काय म्हटले?
जनसुराज पक्ष नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ चौधरी यांना बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेईल आणि ते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार आहेत. मात्र, भाजपाने हे आरोप निराधार आणि वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगून फेटाळून लावले. बिहार भाजपाचे माध्यम प्रभारी दानिश इक्बाल म्हणाले, “प्रशांत किशोर स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी याचा वापर करीत आहेत. त्यांचे आरोप केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा एक हताश प्रयत्न आहे.”

“तारापूर हत्याकांड प्रकरण न्यायालयात आधीच न्यायनिर्णीत झाले आहे आणि न्यायालयाने सम्राट चौधरी यांची आधीच निर्दोष मुक्तता केली आहे. चुकीचे आरोप केल्याबद्दल लालू प्रसाद यादव यांनाही त्यांची माफी मागावी लागली होती,” असे इक्बाल म्हणाले. इक्बाल म्हणाले, “प्रशांत किशोर यांनी ज्या प्रकारे सम्राट चौधरी यांचे नाव या प्रकरणात ओढले आहे, ते त्यांच्या हतबलतेचे उदाहरण आहे. इतरांना बदनाम करण्यासाठी ते किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे यातून दिसून येते.” सोमवारच्या पत्रकार परिषदेत, किशोर यांनी जेडी(यू) मंत्री अशोक चौधरी यांच्यावरही नवे आरोप केले. यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि सरकारी कंत्राटांमध्ये कमिशनचा रॅकेट चालवल्याचा आरोप केला होता.

किशोर यांनी असाही आरोप केला, “गेल्या आठ महिन्यांत २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सरकारी कंत्राटांमधून मंत्री पाच टक्के कमिशन जबरदस्तीने उकळत होते.” ते म्हणाले, “माझ्याकडे अशी कागदपत्रे आहेत, जी दर्शवतात की, अशोक चौधरी यांनी ५०० कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता मिळवली आहे. जर त्यांनी सात दिवसांच्या आत माझ्याविरुद्धची १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस मागे घेतली नाही, तर मी ही कागदपत्रे सार्वजनिक करीन,” असे किशोर म्हणाले.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अशोक चौधरी यांनी किशोर यांचे आरोप निराधार असल्याचे सांगून, ते फेटाळून लावले. “प्रशांत किशोर यांनी माझ्या घोषित मालमत्तेव्यतिरिक्त माझ्या नावावर नोंदणीकृत असलेली एक इंचही जमीन दाखवावी. त्यांनी ते सिद्ध केलेच पाहिजे. ती संस्था (मानव वैभव विकास ट्रस्ट, ज्यावर किशोर यांनी मोठे व्यवहार केल्याचा आरोप केला आहे) १९८५ पासून कार्यरत आहे, त्यामुळे ते करीत असलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. मी त्यांना दोनदा कायदेशीर नोटिसा पाठवल्या आहेत, ज्यावर ते समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे पुरावा असल्यास पत्रकार परिषदेत आरोप करण्याऐवजी, त्यांनी प्रतिज्ञापत्रासह पुढे यावे आणि आपला पुरावा सादर करावा,” असे अशोक चौधरी म्हणाले.
किशोर यांनी स्वतःच्या उत्त्पन्नाविषयी काय खुलासा केला?
प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या पक्षाच्या निधीच्या पारदर्शकतेवर आणि वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने भाजपाला प्रत्युत्तर दिले. प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी गेल्या तीन वर्षांत निवडणूक रणनीतीकाराच्या कामातून एकूण २४१ कोटी रुपये कमावले आहेत आणि या उत्पन्नातून ३०.९५ कोटी रुपये जीएसटी आणि २० कोटी रुपये आयकरही भरला आहे. “मी चोर नाही. मी तीन वर्षांत कायदेशीर सल्लागार म्हणून २४१ कोटी रुपये कमावले आहेत. प्रत्येक रुपयाचा हिशेब आहे आणि सर्व कर रीतसर भरले आहेत,” असे किशोर म्हणाले.

ते म्हणाले की, विविध क्लायंट्सना दिलेल्या धोरणात्मक सल्ल्यातून सल्लागार शुल्क मिळाले आहे आणि त्यांच्या व्यावसायिक कामांमध्ये अनेक उद्योग समाविष्ट आहेत. त्यांनी याचे उदाहरणदेखील दिले. ‘नवयुग कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीने एका उत्पादन लाँचच्या वेळी प्रशांत किशोर यांची दोन तासांची वेळ आणि सल्ला घेण्यासाठी ११ कोटी रुपये दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “गेल्या तीन वर्षांत म्हणजेच २०२१-२२ पासून माझ्या वैयक्तिक खात्यांमध्ये आणि संबंधित संस्थांना २४१ कोटी रुपये सल्लागार शुल्क मिळाले आहे. माझ्या वैयक्तिक खात्यातून मी ‘जनसुराज’ला ९८.७५ कोटी रुपये दान केले,” असे किशोर म्हणाले.
त्यांनी हे सर्व निधी कायदेशीर मार्गाने मिळाले असल्याचेही सांगितले. तसेच, पुढील १० वर्षांत आपली कमाई बिहारमधील व्यवस्था सुधारण्यासाठी समर्पित करण्याची त्यांची वचनबद्धता असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२१ मध्ये राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी कधीही राजकीय सल्ल्यासाठी शुल्क घेतले नव्हते, असा त्यांचा दावा आहे. राजकारणात आल्यावर त्यांनी आपल्या आणि पक्षाच्या कार्यांना पाठिंबा देण्यासाठी सल्ला दिल्यास शुल्क आकारणे सुरू केले, असेही ते म्हणाले.
भाजपाचे प्रशांत किशोर यांच्यावर आरोप
भाजपाचे दानिश इक्बाल यांनी प्रशांत किशोर यांच्या सल्लागार कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “प्रशांत किशोर कोणत्या प्रकारचे सल्ले देतात? बांधकाम कंपन्यांना सल्ला देण्यासाठी प्रशांत किशोर वास्तुविशारद (आर्किटेक्ट) किंवा अभियंता (इंजिनीयर) आहेत का? त्यांचे दावे अर्थहीन आहेत.” इक्बाल यांनी आरोप केला की, किशोर स्वतःच्या कामावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि इतरांवर बोट दाखवून स्वतःचे गैरकृत्य झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.