Prashant Kishore on Bihar Politics : बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीनेही (JSP) बिहारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. “आमचा पक्ष या निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव टाकणार”, असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी इंडियन एक्स्प्रेसला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्याचे राजकारण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली.

जेएसपीच्या यात्रेतून काय निष्कर्ष निघाले?

बिहारमधील ३८ पैकी २० जिल्ह्यात नुकतीच जनसुराज पार्टीची (जेएसपीची) पहिली यात्रा निघाली. या यात्रेतून काय निष्कर्ष निघाले, असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “गेल्या ३५ वर्षांपासून बिहारमध्ये विविध राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. आता राज्यातील लोकांना परिवर्तन हवे आहे. राम विलास पासवान, सुशील कुमार मोदी, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्याऐवजी राज्यातील जनतेला नवीन नेतृत्व हवं आहे. त्यामागचं कारण म्हणजे राज्यातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, स्थलांतराचे प्रमाण वाढलं आहे”, असं उत्तर प्रशांत किशोर यांनी दिलं.

वक्फ विधेयकाबद्दल प्रशांत किशोर काय म्हणाले?

वक्फ विधेयकाबद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “देशाच्या संस्थापकांनी आणि आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी आपले ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्टपणे वर्णन केली आहेत. केंद्र सरकार या उद्दिष्टांचं कसं पालन करतं, त्या आधारावर न्याय देण्याची गरज आहे. वक्फ विधेयकाला इंडिया आघाडीतील घटकपक्ष आणि मुस्लीम संघटनांनी तीव्र विरोध केला होता. वक्फ विधेयक मांडण्याआधी सरकारने विरोधीपक्षांना विश्वासात घेतले पाहिजे होते. मुस्लीम समुदायातील मोठ्या वर्गाचा पाठिंबा असलेले नितीश कुमार हेदेखील त्यांच्या पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर उघडे पडले आहेत. लालूंना बऱ्याच काळापासून मुस्लिमांचे नेते म्हणून पाहिले जात आहे, परंतु आता समुदायाला नवीन नेत्यांची आवश्यकता आहे. भाजपानेही नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा आणि तिहेरी तलाकवर बंदी घालून धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मुस्लीम समुदायाला इंडिया आघाडी व एनडीएचा हेतू समजला आहे. इथेच जेएसपी मुस्लिमांसाठी एक नवा पक्ष म्हणून उदयास आला आहे.”

आणखी वाचा : काँग्रेसनं कंबर कसली, भाजपाचं टेन्शन वाढणार? ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये काय घडणार?

जन सुराज पार्टी इंडिया आघाडीची मतं खाणार?

जन सुराज पार्टी मुस्लीम मतांचे विभाजन करून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत अप्रत्यक्ष मदत करणार, असा दावा विरोधीपक्षांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना, “राजकीय पक्ष घाबरले असून जाणून बुजून आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यावरून असं दिसून येतं की आमचा पक्ष हा चांगल्या मार्गावर चालला आहे. आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही २४३ उमेदवार उभे करणार आहोत. आमच्या पक्षाच्या तत्वांनुसार, कुठलाही जातीयवाद न करता प्रत्येक समुदायातील उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी दिली जाईल. एनडीएमधील नेते नितीश कुमार यांच्या पक्षाला महत्त्व देत असून जनसुराज्य पक्षाला कमी लेखत आहेत. मात्र, आमच्या पक्षाला निवडणुकीत चांगले यश मिळेल”, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.

बिहारच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार?

प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीवर परिणाम करणारी दोन मुख्य कारणंही सांगितली आहेत. “विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ढासळणारी तब्येत आणि त्यांच्या नेतृत्वावर राज्यातील मतदारांना शंका आहे. ज्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल, तेव्हा ते प्रकृतीच्या कारणास्तव शक्यतो सार्वजनिक सभांना संबोधित करू शकणार नाहीत, तेव्हा राज्यातील मतदार नव्या चेहऱ्याकडे बघू शकतात. जन सुराज पार्टी या निवडणुकीच्या निकालांवर नक्कीच परिणाम करेल,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे, मध्यंतरीही प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या प्रकृतीविषयी बोलताना भाष्य केलं होतं. “नितीश कुमार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. ते दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय त्या जिल्ह्याचे नावही सांगू शकत नाहीत. नितीश कुमार यांच्यासारखा नेता बिहारचा मुख्यमंत्री आहे, हेच राज्याचे मोठे दुर्दैव आहे”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती.

हेही वाचा : Ram Temple Event : अयोध्येत आणखी एका भव्य सोहळ्याची तयारी; आता रंगणार प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा

प्रशांत किशोर यांना तेजस्वींबद्दल काय वाटतं?

तेजस्वी यादव यांच्याबद्दल प्रशांत किशोर म्हणाले, “लालू प्रसाद यादव यांचे पुत्र असल्यामुळेच तेजस्वी यादव यांना राजकीय ओळख मिळाली आहे असं मी अनेकदा सांगितलं आहे. चिराग पासवान निश्चितच त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या यात्रा मी फार महत्त्वाच्या मानत नाही. इंडिया आघाडीने बिहारमध्ये तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं तर कन्हैया कुमार आणि काँग्रेसला कुणी फारसं महत्त्व देणार नाही. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नितीश कुमार एनडीएमध्ये पुन्हा परतल्यानंतर भाजपा नेते सम्राट चौधरी यांचंही तसंच झालं होतं. सुशील मोदींनंतर, भाजपाचा राज्यात कोणताही नेता नाही.”

‘…तर भाजपाचा एकही आमदार निवडून येणार नाही’

दरम्यान, प्रशांत किशोर यांची जेडीयूमधून २०२० साली हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते सातत्याने नितीश कुमार यांच्याविरोधात टीकास्र सोडत आले आहेत. नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार वगळून कुणीही मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिलं होतं. “मी पंतप्रधान मोदींना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना आव्हान देतो की, त्यांनी नितीश कुमार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असल्याचे जाहीर करावे. जर भाजपाने अशी घोषणा केली तर त्यांना बिहारमध्ये आमदार निवडून आणणे अवघड होईल. नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली असल्यामुळे एनडीएकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास भाजपाही मागेपुढे पाहत आहे”, असेही प्रशांत किशोर म्हणाले होते.