नांदेड : काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात नजीकच्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाकडे बरेच पर्याय असले, तरी दोन महिन्यांपूर्वी पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाच्या उमेदवारीवर आपला दावा जाहीर केला आहे.

छत्रपती संभाजीनगरात रविवारी नंदिग्राम मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना चिखलीकर यांनी भाजपा नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोरच लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी दर्शविली.

हेही वाचा – राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चिखलीकर यांनी आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत होते. या दरम्यान त्यांनी स्वतः तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य आणि राजकीय वर्तुळातील चर्चा यावरून चिखलीकर भाजपा सोडून पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात जातील, असा अंदाज वर्तविला जात होता, पण खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय स्थितीत चिखलीकर यांनी भाजपाकडे दोन्हींपैकी कोणतीही निवडणूक लढण्याची तयारी दर्शवून पक्षातील अन्य इच्छुकांच्या एक पाऊल पुढे टाकले.

छ. संभाजीनगरातील मेळाव्याचे आयोजन चिखलीकर व त्यांच्या परिवाराच्या नियोजनातूनच झाले होते. दानवे यांना आमंत्रित करण्यात त्यांचाच पुढाकार होता. या मेळाव्याची पत्रिका गेल्या आठवड्यात जारी झाल्यावर नांदेडमधील भाजपा नेत्यांना आपल्या माजी खासदारांचा ‘प्रताप’ लक्षात आला. खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे यांना आमंत्रित न करता त्यांनी दानवे, खासदार भागवत कराड प्रभृतींना महत्त्व दिल्याचे दिसले.
वसंतराव चव्हाण यांचे निधन होऊन एक आठवडा लोटला आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा होत असली, तरी काँग्रेस किंवा भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये ‘उमेदवारी’संदर्भात कोणत्याही नावाची अद्याप चर्चा नाही. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होईल काय, यावर खल होत आहे. रिक्त झालेल्या जागेवर वसंतरावांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण हे काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढवतील काय, याचा अंदाज भाजपातील काही नेते घेत आहेत, पण उमेदवारीच्या विषयात चिखलीकर यांनी आपली तयारी उघड केल्यानंतर इतर इच्छुकांच्या हालचाली आता सुरू होतील, असे मानले जाते.

हेही वाचा – विधिमंडळातील आश्वासने हवेत विरली !

नांदेड लोकसभा मतदारसंघात १९८७ साली लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा काँग्रेसने पुन्हा जिंकली होती. त्यानंतर सुमारे ३८ वर्षांनी नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून काँग्रेसने दिवंगत वसंतरावांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उभे केले पाहिजे, असा सर्वसाधारण सूर असल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून जे प्रतिस्पर्धी खासदार झाले, ते पुन्हा दुसर्‍यांदा खासदार झाले नाहीत. केशवराव धोंडगे, डॉ. व्यंकटेश काब्दे, डी.बी. पाटील ही त्यांतली ठळक नावे. चिखलीकरांचे नाव त्यात समाविष्ट झाले असले, तरी सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुकीचा प्रसंग उद्भवल्यामुळे भाजपा चिखलीकर यांना पुन्हा संधी देणार, का उमेदवार बदलण्याचा प्रयोग करणार ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.