नाशिक : राममंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बरोबर १० दिवस आधी अयोध्येनंतर श्रीरामाशी संबंधित महत्वपूर्ण तीर्थस्थान म्हणून हिंदू धर्मीयांची सर्वाधिक श्रध्दा असलेल्या नाशिक येथे २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. अयोध्या आणि नाशिक या दोन्ही ठिकाणांचे रामसूत्र आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, फायदेशीर ठरण्याची शक्यता लक्षात घेऊनच केंद्रातील भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी सोलापूरऐवजी धार्मिक नगरी नाशिकची निवड केल्याचे बोलले जाते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी होणाऱ्या या युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी कारणीभूत आणि सत्ता मिळाल्यावर ती टिकवून ठेवण्यासाठी आधार ठरलेला अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा आगामी लोकसभा निवडणुका ध्यानात ठेवून पुन्हा एकदा ठसठशीतपणे बिंबविण्यासाठी भाजपकडून नियोजनबध्द पध्दतीने प्रयत्न चालू आहेत. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश राममय करण्यात भाजपसह त्यांना सहकार्य करणारे पक्ष, संघटना गुंतल्या आहेत. अयोध्येतून आणलेल्या अक्षता मंगल कलशांची गावोगावी मिरवणूक काढली जात असून अक्षतांचे घरोघरी वाटप केले जात आहे. हिंदू जनजागृती यात्रा ठिकठिकाणी काढल्या जात आहेत. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपकडून पुन्हा एकदा राममंदिर हाच प्रमुख मुद्दा राहणार हे उघड असल्याने श्रीरामाशी संबंधित ठिकाण असलेल्या नाशिक येथे अयोध्येतील सोहळ्याआधी केवळ काही दिवस आधी राष्ट्रीय युवा महोत्सव आणि या महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन, हा निश्चितच योगायोग म्हणता येणार नाही. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रातील यश केंद्रात सत्तेच्या सोपानासाठी प्रबळ ठरणार असल्याने भाजपकडूनही त्यादृष्टीनेच हालचाली करण्यात येत आहेत.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

हेही वाचा : पालघरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची !

वनवासात असताना श्रीराम, सीता, लक्ष्मण यांनी नाशिकजवळील पंचवटीत वास्तव्य केल्याचा रामायणात उल्लेख आहे. त्यामुळे नाशिक हे हिंदू धर्मीयांसाठी पवित्र तीर्थस्थळ. वर्षभर देशाच्या विविध भागातून, विदेशातून भाविकांचा राबता असतो. या धार्मिक नगरीतील महापालिकेवर प्रशासक नियुक्तीआधी भाजपचीच सत्ता होती. या शहरातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. इतकेच नव्हे तर, उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहापैकी पाच जागाही भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेसाठी सर्वप्रकारची रसद जमविणेही सुलभ. वास्तविक हा महोत्सव सोलापूरमध्ये आयोजित करण्यात येणार होता. पण नंतर नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात वातावरण निर्मितीसाठी मोदी यांच्या सभेचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : ईडीचा ससेमिरा, शरद पवारांचे नातू अन् राष्ट्रवादीचे उदयोन्मुख स्टार; कोण आहेत रोहित पवार?

राष्ट्रीय युवा महोत्सवास देशभरातील विविध राज्यातील आठ हजारपेक्षा अधिक युवक-युवती उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या माध्यमातून देशभरातील युवावर्गावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीनेही या जाहीर सभेच्या नियोजनकडे पाहिले जात आहे. मन की बात, परीक्षा पे चर्चा यासारख्या कार्यक्रमांव्दारे पंतप्रधान मोदी हे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी कायमच संवाद साधत असतात. युवा महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त त्यांना युवावर्गालाही आपलेसे करण्याचा प्रयत्न करता येणार आहे.

“अयोध्येतील सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त नाशिक येथे जाहीर सभा होत असल्याने ती भव्यदिव्य होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सभेसाठी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असे लक्ष्य आहे.” – प्रशांत जाधव (महानगर अध्यक्ष, भाजप, नाशिक)