पुणे : पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजी रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निरीक्षक पदी माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती केल्याने पुण्यातील काँग्रेसची सूत्रे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या ताब्यात गेली आहेत. पाटील यांनी समेट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत माजी आमदारांनी निमंत्रण देऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आमदारांची बैठक होऊ शकली नाही.

पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचेही निश्चित केले होते. मात्र, मेळावा न झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही पदाधिकाऱ्यांंमधील रुसव्याफुगव्यांमुळे माजी आमदारांची बैठक आणि कार्यकर्ता मेळावा न झाल्याने अंतर्गत गटबाजी थोपविण्याऐवजी पुन्हा एकदा उफळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांंची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याची जबाबदारी सतेज पाटील यांंच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यातील काँग्रेसची सूत्रे कोल्हापूरकडे गेली आहेत. पाटील यांनी सोमवारी काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेतली. पाटील यांनी गटबाजी विसरून मनोमीलन घडवून आणण्याचा प्रयत्न या बैठकीद्वारे केला. पक्षात आगामी काळात काही बदल करण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. पक्षांतर्गत बदल करताना काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच पक्षवाढीसाठी ब्लॉक कमिट्यांंची संख्या वाढविणार असल्याचे सांगितले. सध्या १२ ब्लॉक कमिट्या आहेत. आता शहराच्या विस्ताराप्रमाणे ब्लाॅक कमिट्यांंचा विस्तार करण्याचीही घोषणा पाटील यांनी केली.

पाटील यांंच्या दौऱ्याचे नियोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले हाेते. त्यामध्ये माजी आमदारांंची बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले होते. पक्षवाढीसाठी जुनाजाणत्या नेत्यांंच्या मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन माजी आमदाची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. एकेकाळी पुण्यात काँग्रेसच्या आमदारांंची संख्या जास्त होती. सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीत माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकमेव काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. आता त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत काँग्रेसचा शहरात एकही आमदार नाही. हे चित्र बदलण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकांंच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांंची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांंमधील गटबाजीमुळे ही बैठक घेण्याचे टाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला काही मोजक्याच माजी आमदारांनी काँग्रेस भवनमध्ये हजेरी लावली. निमंत्रणाअभावी अन्य माजी आमदारांनी काँग्रेस भवनमध्ये येणे टाळले. ज्येष्ठ नेत्यांंना आमंत्रण न दिल्याने आता पक्षातील दोन गटांंमध्ये जुंपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीनंतर कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मेळावा घेण्याचेही नियोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस भवन येथे बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी पक्षांतर्गत बदल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे इच्छुक पदाधिकारी हे मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत होते. मात्र, हा मेळावाच न झाल्याचे इच्छुकांंचा हिरमोड झाला. दरम्यान, याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांंनी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला.