यवतमाळ : पुसद येथील नाईक घराण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर नाईक बंगल्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. थोरले की धाकटे? असा पेच नाईक कुटुंबात निर्माण झाल्याची चर्चा आहे.

नाईक घराणे महाराष्ट्र राज्य निमिर्तीच्या आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या कुटुंबाने राज्याला दिले. वसंतराव, सुधाकरराव, अविनाश, मनोहरराव, नीलय आणि विद्यमान आमदार इंद्रनील नाईक, अशी पंरपरा सुरू आहे. शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुधाकरराव नाईक त्यांच्यासोबत गेले. तेव्हापासून नाईक कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुसदचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटात गेले. त्यांचे वडील मनोहरराव नाईक यांनी याबाबत कधी जाहीर भाष्य केले नसले तरी मुलासोबत तेही अजित पवार गटात असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा : “लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, पंजाब काँग्रेसचा गंभीर आरोप!

मनोहराव नाईक यांचे थोरले चिरंजीव ययाती नाईक हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. मात्र त्यांना डावलून इंद्रनील यांना आमदारकीची संधी मिळाली. तेव्हापासून ते राजकीय संधीच्या शोधात होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर लहान भाऊ अजित पवार गटात गेल्याने ययाती यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवली. येत्या विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांनी थेट शरद पवार यांना गळ घातली. यातूनच पुसदच्या नाईक बंगल्यासमोर शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आदी नेत्यांचे छायाचित्र असलेले ‘भावी आमदार ययाती नाईक,’ अशा आशयाचे फलकही लागले होते. हे फलक आता काढण्यात आले असले तरी, ययाती यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मात्र, त्यांच्यासमोर कुटुंबातूनच बंधू इंद्रनील नाईक यांचे आव्हान आहे. इंद्रनील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार, हे स्पष्ट असले तरी त्यांनीही शरद पवार यांची गोपनीय भेट घेतल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

भाजपचे माजी विधान परिषद सदस्य ॲड. नीलय नाईक हेसुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांची वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने इंद्रनील नाईक यांच्या मार्गातील महायुतीतील स्पर्धक दूर झाला आहे.

हेही वाचा : भाजपचे ११० उमेदवार निश्चित, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय; पहिली यादी उद्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांची खेळी ठरणार महत्त्वपूर्ण

पुसद हा बंजाराबहुल मतदारसंघ आहे. नाईक कुटुंबीयांच्या वर्चस्वामुळे येथे गेल्या काही वर्षांत अन्य समाजातील उमदेवार विजयी झालेला नाही. यावेळी मात्र नाईक कुटुंबातील राजकीय अस्थिरतेचा लाभ शरद पवार घेतील, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यांनी ययाती यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिल्यास पुसदमध्ये दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुसदच्या राजकीय इतिहासात ही महत्त्वपूर्ण घटना ठरेल.