Rahul Gandhi In Parliament : राहुल गांधी आणि काँग्रेस मागील काही काळापासून सामाजिक न्यायाची भाषा बोलताना दिसत आहेत. सर्व जातींना समान प्रतिनिधित्व देण्याच्या मुद्द्यापासून ते देशव्यापी जातीनिहाय जनगणनेची मागणी इथपर्यंत हा प्रवास राहिला आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी शनिवारी ‘खालच्या जातीचा’ मानल्या जाणाऱ्या महाभारतामधील एकलव्याचा उल्लेख करत या चर्चेला आणखी एक पदर जोडला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावरील चर्चेत राहुल गांधी सहभागी झाले. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, “सावरकर यांनी भाष्य केले होते की, भारतीय संविधानाबाबत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. हिंदू राष्ट्रात वेदानंतर मनुस्मृती हा सर्वात पूजनीय असा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथाने अनेक शतकांपासून देशाच्या आध्यात्मिक आणि दैवी मार्गाचे संहिताकरण केले आहे. आजही मनुस्मृती हा कायदा आहे.”

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की ,”सावरकरांची इच्छा होती की भारत ज्या पुस्तकाच्या आधारावर चालवला जाईल ते पुस्तक हे (मनुस्मृती) असावे आणि याच गोष्टीसाठी संघर्ष (भाजपा आणि विरोधक यांच्यात) सुरू आहे”.

महत्वाची बाब म्हणजे दलित कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी लढणारे मनुस्मृतीला राज्यघटनेच्या विचारांच्या विरोधी मानतात. तसेच त्यांचे म्हणणे आहे की, त्या मार्गेने गेल्यास दलित, आदिवासी, महिला आणि मागास समाजातील लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरतात.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सवाल केला की, सावरकरांनी जे काही म्हटलंय त्याला भाजपाचा पाठिंबा आहे का?. ते म्हणाले की, “तुम्ही तुमच्या नेत्याच्या शब्दांना पाठिंबा देता का? कारण जेव्हा तुम्ही संसदेत संविधान रक्षणाबद्दल बोलता तेव्हा तुम्ही सावरकरांची विटंबना करता, त्यांचा अपमान आणि बदनामी करता”.

हेही वाचा>> महायुतीच्या मंत्रिमंडळात किती महिला आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली? वाचा यादी!…

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे यापूर्वीही सावरकरांविषयी बोलले आहेत, मात्र यावेळी त्यांच्या भाषणात एकलव्यावर देण्यात आलेला जोर लक्षणीय होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात राज घराण्यातील पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांनी एकलव्याचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला, कारण तो खालच्या निषाद (Nishad) जातीत जन्मला होता, याबद्दल विस्ताराने माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, द्रोणाचार्य यांचा मातीचा पुतळा बनवून एकलव्यने कशा प्रकारे स्वत:ला धनुर्विद्या शिकवली आणि त्यानंतर द्रोणाचार्य यांनी त्याला पुन्हा धनुष्यबाण पकडता येऊ नये म्हणून, गुरूदक्षिणेमध्ये त्याचा अंगठा मागितला.

गांधी म्हणाले की, अशाच प्रकारे नरेंद्र मोदी सरकार हे मागे पडलेल्या तरुणांचं कौशल्य हिरावून घेण्यासाठी त्यांचा उजवा अंगठा कापत आहेत . ते म्हणाले की “जसे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला, त्याच प्रकारे तुम्ही भारतातील तरुणांचे अंगठे कापत आहात.”

पुढे राहुल गांधी यांनी याची तुलना मोदी सरकार अदाणी समूहाबद्दल पक्षपातीपणाची भूमिका घेत असल्याशी केली. तसेच त्यांनी हे उदाहरण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण डावलून होणारी लॅटरल एंट्री , संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजना यांच्या माध्यमातून भारतातील तरुण, मागस आणि गरिबांचे खच्चीकरण होत असल्याशी जोडले.

राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेस लोकसभा निवडणुकीपासून ही आश्वासने सातत्याने देत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतदेखील हे मुद्दे काँग्रेसच्या अजेंड्यावर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींनी पुढे २०२० हाथरस बलात्कार हत्या प्रकरण आणि दलित पीडित कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. या मुद्द्यांवर प्रियांका गांधी यादेखील त्यांच्या लोकसभेतील पहिल्या भाषणात बोलल्या होत्या. राहुल आणि प्रियांका गांधी या दोघांनीही संभल येथील वाद आणि हिंसाचार याचा उल्लेख लोकसभेतील भाषणात केला.