Rahul Gandhi Prime Minister offer बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी दावा केला आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली होती. यादव यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली होती, जी त्यांना स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली होती.” पप्पू यादव नक्की काय म्हणाले? त्यांनी राहुल गांधींविषयी काय म्हटले? जाणून घेऊयात.
पप्पू यादव यांचा राहुल गांधींबद्दल दावा
- पप्पू यादव यांनी सांगितले की, दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. पण, राहुल गांधी यांनी ती ऑफर नाकारली होती.
- ते म्हणाले, “राहुल गांधी एक हुशार व्यक्ती आहेत, त्यांनी एका क्षणात पंतप्रधानपदाची खुर्ची नाकारली. हार्वर्ड विद्यापीठातून आलेले, १०,००० किलोमीटर चालणारे आणि पंतप्रधानपद नाकारणारे राहुल गांधी एक हुशार व्यक्ती आहेत. त्यांचा न्यायतत्त्वांवर विश्वास आहे.”
- ते म्हणाले, “मनमोहन सिंगजी म्हणाले, राहुल तुम्ही पंतप्रधान व्हा, पण त्यांनी नाही असे म्हटले,” असा खुलासा पप्पू यादव यांनी आपल्या मुलाखतीत केला.

“काँग्रेसला बिहारमध्ये मजबूत नेतृत्वाची गरज”
पप्पू यादव सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष उमेदवार म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारून ती जागा मित्रपक्ष असलेल्या आरजेडीला दिल्याने पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यादव यांनी काँग्रेसला बिहारमध्ये मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. पप्पू यादव यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “काँग्रेसला मजबूत नेतृत्वाची गरज आहे, काँग्रेसने मला आजपर्यंत बिहारमध्ये कधीच स्वीकारले नाही.”
“मोदींकडे पाच इंचाची छाती”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पप्पू यादव म्हणाले, “लोकांना आता कळले आहे की पंतप्रधान मोदींकडे ५६ इंचाची छाती नाही, तर ५ इंचाची छाती आहे. जग आपली खिल्ली उडवत आहे. ते म्हणत आहेत की, त्यांनी इतका कमकुवत पंतप्रधान कधीच पाहिला नाही.” पप्पू यादव पुढे म्हणाले की, संवैधानिक आणि लोकशाही हक्कांची पायमल्ली होत आहे. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या गंभीर चिंतांवर तोडगा काढल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, “बिहारमधील एसआयआर हादेखील एक मोठा मुद्दा आहे, ज्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. संपूर्ण विरोधी पक्ष आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या मुद्द्यांवर सरकारने उत्तरे दिली पाहिजेत,” असे त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधींना ‘पप्पू’ संबोधल्याबद्दलही त्यांनी टीका केली.
“गर्विष्ठ युवराजांबरोबर व्यासपीठ शेअर करणार नाही”
पप्पू यादव यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, ते यापुढे गर्विष्ठ युवराजांबरोबर व्यासपीठ शेअर करणार नाहीत. ‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात कोणत्याही पक्षाच्या गर्विष्ठ युवराजाबरोबर व्यासपीठ शेअर करणार नाही.” ‘युवराज’ म्हणजे कोण असे विचारले असता त्यांनी सांगितले, “ज्याला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि ज्याला त्याबद्दल गर्व आहे, जो वडिलांच्या वारशावर आपले राजकीय भविष्य पुढे नेत आहे आणि ज्याला संघर्ष काय याविषयी काहीही माहिती नाही.”
यादव यांनी हे वक्तव्य बिहारमध्ये विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या वादानंतर केले आहे. या आंदोलनादरम्यान त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका ट्रकमध्ये चढण्यापासून रोखले होते. बिहारमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाच्या एसआयआर निर्णयाविरोधातील एका रॅलीदरम्यान ही घटना घडली होती. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव ज्या व्हॅनमध्ये होते, त्यात पप्पू यादव आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार (एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रभारी) यांना चढण्यापासून रोखण्यात आल्याचे दिसून आले होते.
या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि त्यानंतर इंडिया आघाडीतील अंतर्गत तणावाच्या चर्चा सुरू झाल्या. या वादानंतरही यादव यांनी राहुल गांधींचे कौतुक कायम ठेवले. ते म्हणाले, “आमचे नेते राहुल गांधी तेथे होते, त्यामुळे माझी उपस्थिती आवश्यक नव्हती.” संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडले गेले असेही त्यांनी सांगितले.