काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नव्याने केलेल्या विधानाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. माफी मागायला मी सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यानंतर हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाच्या कानी घातली आहे. सावरकरांवरील विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असे शरद पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> सावरकर वादावर काँग्रेस-ठाकरे गटात पवारांची मध्यस्थी

…तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी संध्याकाळी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महाराष्ट्रात खूप आदर केला जातो. त्यामुळे त्यांच्यावर टीका केल्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होऊ शकेल, असे शरद पवार या बैठकीत म्हणाले. तसेच वीर सावरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. विरोधी पक्षांची खरी लढाई ही भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे, असेही शरद पवार राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले आहेत.

हेही वाचा >> उत्तर प्रदेशमध्ये सारस क्रौंच पक्ष्यावरून राजकारण; मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याची भाजपाची सपावर टीका

राहुल गांधी काय म्हणाले होते?

ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाही तसेच संसदेविषयी भाष्य केले होते. त्यानंतर भाजपाने आक्रमक होत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र, माफी मागायला मी सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राहुल गांधी यांचे नाव घेत आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या याच विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. असे असतानाच शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेसने सावरकरांच्या बाबतीत सबुरीने घ्यावे, असे सांगितले आहे.