उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी सारस क्रौंच या वन्यपक्ष्यामुळे भाजपा आणि सपा या दोन पक्षांत शाब्दिक वाद उफाळला आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद आरिफ या युवकाने एका घायाळ सारस क्रौंच पक्ष्याची शुश्रूषा केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. सारस क्रौंच पक्षी हा संरक्षित वन्यप्राण्यांच्या यादीत येत असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या वनविभागाने सारस क्रौंचला आरिफकडून ताब्यात घेतले आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आरिफवर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा आणि सपा पक्ष आमनेसामने आले आहेत. मोहम्मद आरिफ याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी रविवारी भाजपावर जोरदार टीका केली. अखिलेश यांच्या टीकेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनीदेखील यादव यांच्यावर आरोपांची राळ उठवली. सपाचे प्रमुख यादव हे आरिफचे नाव आणि सारस क्रौंच पक्ष्याच्या आडून राजकारण खेळत आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला. तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि. २७ मार्च) राज्य पक्षी सारस क्रौंच आणि राज्य प्राणी बाराशिंगा यांच्यासाठी विशेष राखीव पार्क उभारण्याची घोषणा केली. या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली. ३५ वर्षीय आरिफने एका जखमी सारस क्रौंच पक्ष्याला आपल्या घरी आणून त्यावर उपचार केले. तब्बल १३ महिने हा पक्षी त्याच्यासोबतच होता. दरम्यान दोघांच्या मैत्रीचा विषय सर्वदूर पोहोचला. दोघांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होऊन चर्चेचा विषय ठरले. ५ मार्च रोजी समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आरिफच्या घरी भेट देऊन त्याची आणि क्रौंच पक्ष्याची मैत्री अनुभवली. या भेटीचे काही फोटो अखिलेश यांनी ट्विटरवर पोस्ट केले. २१ मार्च रोजी, वनविभागाच्या लोकांनी आरिफच्या घरी धाड टाकून सारस क्रौंच पक्ष्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी रायबरेली येथील समसपूर येतील पक्षी अभयारण्यात केली. अखिलेश यादव यांनी आरोप केला की, मी आरिफच्या घरी भेट दिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र वनविभागाने हे आरोप फेटाळून लावले. आरिफकडील सारस क्रौंच पक्षी दुसऱ्याच दिवशी अभयारण्यातून निसटला आणि जवळपास अर्धा किलोमीटर दूरवर काही शेतकऱ्यांना आढळला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुत्र्यांपासून त्याला वाचविले. शनिवारी (दि. २५ मार्च) या पक्ष्याला कानपूरमधील प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आले. हे वाचा >> विश्लेषण : रामायण ज्याच्यामुळे रचले गेले तो ‘सारस क्रौंच’ पक्षी आणि उत्तर प्रदेशचा मोहम्मद आरिफ यांचा नेमका संबंध काय? अखिलेश यादव यांनी आरिफ आणि पक्षाच्या काही नेत्यांसोबत लखनऊ येथे रविवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, "आरिफने मला मतदान केले. तुमचे आरिफशी वैर असू शकते, पण सारस क्रौंच पक्ष्याशी तुमचे वैर कशासाठी? त्या पक्ष्याने मला मतदान केलेले नाही. तुमची लढाई समाजवाद्यांशी आहे. आम्ही सारस क्रौंच पक्ष्यासोबत फोटो काढले याचे मुख्यमंत्र्यांना वाईट वाटण्याचे कारण काय?" यादव यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी तात्काळ त्यांना उत्तर दिले. अखिलेश यादव यांचे पक्षी आणि इतर प्राण्यांवरचे प्रेम उत्तर प्रदेशला माहीत आहे. त्या सारस पक्ष्याला प्राणिसंग्रहालयात कैद करण्यात आलेले नाही. तर त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी त्याला तिथे ठेवण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. तर दुसऱ्या एका भाजपा नेत्याने सांगितले की, सपाच्या नेत्यांना मुस्लीम मतदारांची सहानुभूती मिळवायची आहे. काही काळापूर्वी इतर मुस्लीम नेत्यांच्या विषयाबाबत अखिलेश यादव यांनी सोईस्कर मौन बाळगले होते. त्यामुळे या विषयाच्या माध्यमातून यादव यांना पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजाचे लक्ष स्वतःकडे वळवायचे आहे. तसेच अखिलेश यादव यांनी यापूर्वी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते किंवा सामान्य माणसाप्रति एवढा कळवळा कधी दाखवला नव्हता, याकडेही भाजपाच्या नेत्याने लक्ष वेधले. भाजपाच्या आरोपांना उत्तर देत असताना सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, भाजपा सरकारने सारस क्रौंच पक्षी आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याप्रति थोडी संवेदनशील भूमिका दाखवायला हवी. मात्र सरकारने त्या दोघांबाबत अन्याय केला आहे. समाजवादी पक्षाचे अमेठी जिल्हाध्यक्ष राम उदित यादव म्हणाले की, सपाच्या स्थानिक नेत्यांनी आरिफ आणि अखिलेश यादव यांची भेट घडवून आणली होती. आरिफ हा मागच्या तीन वर्षांपासून सपाचा कार्यकर्ता असल्याचेही यादव यांनी जाहीर केलेले आहे. आरिफने मात्र समाजवादी पक्षाशी नाते नसल्याचे सांगतिले. "मी कधीही समाजवादी पक्षाचा सदस्य नव्हतो. अखिलेश यादव हे माझ्या घरी आले, तेव्हा पहिल्यांदाच आमची भेट झाली. त्यांनी माझ्या घरी भेट दिल्यानंतर सपाचे अनेक नेते आणि इतर लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. मात्र हेही खरे आहे की, वन विभागाच्या कारवाईनंतर केवळ समाजवादी पक्षानेच मला पाठिंबा दिलेला आहे.", अशी प्रतिक्रिया मोहम्मद आरिफ याने दिली. सपा आणि भाजपामध्ये सारस पक्ष्यावरून चाललेल्या शाब्दिक वादावर प्रतिक्रिया देताना आरिफ म्हणाला की, मला या प्रकरणात कोणतेही राजकारण दिसत नाही. सारस क्रौंच पक्ष्याला माझ्याकडे परत द्या, असे मी कधीही म्हणालो नाही. माझे एवढेच म्हणणे आहे की, त्या सारस पक्षाला प्राणीसंग्रहालयात न ठेवता अमेठीच्या जंगलात मुक्तपणे वावर करण्यासाठी मोकळे सोडले गेले पाहीजे.