एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर सुरू असलेल्या भारत-पाक सीमेवरील तणावाचा पूंछ जिल्ह्याला सर्वांत जास्त फटका बसला होता. त्या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. दरम्यान, पूंछमधल्याच क्राइस्ट पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन जुळ्या मुलींचा बळी गेला होता. हा जिल्हा एलओसीजवळ असल्याने पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात येथील नागरिकांचा नाहक बळी गेला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी पूंछ येथे भेट दिली. २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानसोबतचा सीमापार तणाव वाढत आहे. त्यामुळे पूंछ जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्यांमध्ये उर्बा फातिमा व झैन अली या दोन शाळकरी मुलींचा समावेश होता. १२ वर्षांच्या या दोघी बहिणी फक्त दोन महिन्यांपूर्वीच शाळेजवळील भागात राहण्यास गेल्या होत्या. त्या गोळीबारात बळी गेलेल्यांमध्ये विहान भार्गव नावाच्या मुलाचाही समावेश आहे. विहानचे कुटुंबीय गोळीबारानंतर शहर सोडून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याआधीच झालेल्या हल्ल्यात विहानचा गोळी लागून मृत्यू झाला.
राहुल गांधी यांनी पूंछमधील क्राइस्ट पब्लिक स्कूलच्या विद्यर्थ्यांसोबत संवाद साधला. “कठोर परिश्रम करा, अधिक खेळा व शाळेत खूप मित्र बनवा, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. उर्बा आणि झैन या दोन्ही मुली याच शाळेत शिकत होत्या. “मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला तुमच्या लहान मित्रांची आठवण येते. मलाही त्याबद्दल खूप वाईट वाटते”, अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं सांत्वन राहुल गांधींनी केले. त्यानंतर राहुल गांधी बळी गेलेल्या दोन बहिणींबाबत विचारपूस करीत होते. “त्यांनी त्या काय करायच्या, त्या कशा होत्या, त्यांना कसे वाटले अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांनी या दोन्ही मुलींच्या मित्रांना विचारले. त्या दोघींना क्रिकेट खेळायला आवडायचे आणि त्या आमच्या मैत्रिणी होत्या. तसेच त्या खूप अभ्यास करीत आणि इतरांनाही मदत करीत अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही हल्ला, गोळीबार अशा विचित्र घटना पाहिल्या आहेत. आता तुम्हाला काहीशी भीती वाटत असेल; पण काळजी करू नका. सर्व काही पूर्वीसारखंच सामान्य होईल. याला तुम्ही प्रतिसाद द्या आणि तो म्हणजे खूप मेहनतीने अभ्यास करूनच. खूप खेळा आणि शाळेत खूप मित्र बनवा.” यावेळी राहुल यांनी गोळीबारात बळी गेलेल्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे मंत्री जावेद राणा हेदेखील उपस्थित होते. राहुल गांधींनी यादरम्यान गुरुद्वारा सिंह सभा, गीता भवन व झिया उल आलूमलाही भेट दिली. हे तिन्ही परिसर गोळीबारात सर्वांत जास्त प्रभावित झाले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पूंछमधील गोळीबारात १० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास ४० जण जखमी झाले होते. झिया उल आलूम या धार्मिक शाळेवर झालेल्या गोळीबारात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आणि जवळपास सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.
राहुल गांधींच्या भेटीदरम्यान शहरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शहरातून प्रवास केला. श्रीनगरला जाताना त्यांनी पूंछमधील परिस्थितीचे वर्णन एक मोठी दुर्घटना आहे, असे केले. “बरेच लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,” असे ते यावेळी म्हणाले. “शहरातील रहिवाशांशी संवाद साधताना समोर आलेले काही मुद्दे ते राष्ट्रीय स्तरावर उपस्थित करतील”, असेही ते म्हणाले आहेत. या महिन्यात राहुल गांधी यांचा हा दुसरा जम्मू-काश्मीर दौरा आहे. गोळीबारानंतर त्यांनी याआधी काश्मीरला भेट दिली होती. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार आणि हल्ले होत आहेत. यामध्ये सीमेजवळील भागातील लोकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे.