अलिबाग : रायगडचे पालकमंत्री आपणच होणार, असे वारंवार जाहीर करूनही नेमणूक होत नसल्याने आधीच संतप्त असलेले मंत्री भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कारण महाराष्ट्र दिनी अलिबागमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आल्याने गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्र दिनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचे संकेत आहेत. पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती. पण शिवसेनेच्या विरोधानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. सरकारच्या नव्या आदेशाने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शासनाच्या या भूमिकेचा शिवसेनेचे सत्ताधारी आमदार महेंद्र दळवी यांनी निषेध नोंदवला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे, तो तिढा आजही सुटलेला नाही. दुसरीकडे तिढा सोडवण्याच्या दृष्टीने पाऊले उचललली जात नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून होणारी विकासकामे थांबली आहेत. हा रायगडवासियांचा अवमान आहे असा आरोप आ. दळवी यांनी केला.
आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाची संधी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी आहे. ज्यांच्यामुळे २०१९ मध्ये सरकार परीवर्तीत झाले त्यांनाच उचलून धरण्याची भूमिका घेतली जात असेल तर ते योग्य नाही. उद्या यासंदर्भात पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून आदिती तटकरे यांना ध्वजवंदनापासून रोखण्याची व्युहरचना आखली जाईल असे आ. दळवी यांनी सांगितले.
जिल्हयातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकारयांनी आमदार दळवी यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. महाडचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पुन्हा रस्त्यावर उतरण््याचा इशारा दिला आहे. प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे यांना संधी दिली यावेळी हा मान भरत गोगावले यांचाच आहे असा दावा महाडीक यांनी केला आहे. आम्ही अडीच वर्षांपूर्वी जो उठाव केला होता तो यासाठीच होता याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे ध्वजवंदन सोहळ्याच्या मुद्द्यावरून महायुतीचा वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.