अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या महिन्यात काढलेल्या ‘सातबारा कोरा’ यात्रेला पाठिंबा जाहीर केला आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेत सहभागी झाले, तेव्हाच बच्चू कडू यांना नवा साथीदार मिळाल्याचे स्पष्ट झाले. पण, बच्चू कडू यांनी यांनी बुधवारी राज ठाकरेंची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी या नवीन समीकरणांवर शिक्कामोर्तब झाले.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते, शेतकरी नेते त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. पण, आता राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्याशी थेट आगामी आंदोलनाची दिशा, धोरण आणि मागण्यांविषयी चर्चा केल्याने येत्या काळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मनसेच्या कार्यक्रम पत्रिकेवर देखील ठळकपणे येईल, असे संकेत मिळाले आहेत.

मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी बच्चू कडू यांच्याकडून राज ठाकरेंना औपचारिक आमंत्रण देण्यात आले आहे. या आमंत्रणाचा स्वीकार करत राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न हाच संवादाचा विषय होता. शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे, मात्र राज्य सरकार त्याची टिंगल करत आहे. दुष्काळ पडला की कर्जमाफी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ही एकप्रकारे त्यांची टिंगलच आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, हे शेतकऱ्यांचे दुष्काळापेक्षाही मोठे दु:ख आहे. भविष्यात राज्यव्यापी आंदोलन होईल तेव्हा मुंबईनेही या आंदोलनात एक ते दोन तास शेतकऱ्याच्या पाठी उभे राहावे, यासाठी राज ठाकरेंना आमत्रंण दिले आहे, तसेच त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे, अशीही त्यांना विनंती केल्याचे बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे.

बच्चू कडू यांनी काढलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या पदयात्रेत राज ठाकरेंच्या आदेशानुसार आपण यापूर्वीही सहभागी झालो होतो. त्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आणि दिव्यांग बंधूंचे प्रश्न सुटावेत, साठी अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे तिथे राज ठाकरेंची एक सभा व्हावी, अशी बच्चू कडू यांची इच्छा आहे. त्यानुसार राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी काही काळ मुंबई बंद राहावी, यावर आम्हीही सकारात्मक आहोत, वेळ आली तर त्याला आम्हीही पाठिंबा देऊ, असे बाळा नांदगावकर यांचे म्हणणे आहे.

बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत जुनी ओळख आहे. बच्चू कडू यांनी स्वतंत्रपणे प्रहार संघटना स्थापन करून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न हाती घेतले. अभिनव पद्धतीने आंदोलने करून सरकारला मागण्यांची दखल घेण्यास त्यांनी भाग पाडले. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महायुतीत असूनही विरोधी राजकारण केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. आता शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपला म्हणजेच महायुती सरकारला आव्हान दिले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले आहेत. आता राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर तयार होणाऱ्या नवीन समीकरणांवर सरकार काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे.