Raj Thackeray – Uddhav Thackeray: जवळपास २० वर्षांनंतर मुंबईच्या वरळी डोममध्ये महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावी असणारं ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेचे असंख्य कार्यकर्ते आणि मूळ शिवसेनेचे जुने शिवसैनिक यांच्यासाठी हा प्रसंग आल्हाददायक आणि उत्साहाचा ठरला असला, तरी त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र अनेक प्रकारचे संदेश वेगवेगळ्या पक्षांना गेले आहेत. मग यात सध्या राज्यात सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असणारी भाजपा असो, मूळ शिवसेनेचंच अपत्य असणारी शिंदेंची शिवसेना असो, वैचारिक तडजोडीतून मविआत आलेली काँग्रेस असो किंवा दोन गटांत विभागली गेलेली राष्ट्रवादी असो. ठाकरे बंधूंचा हा ‘बंधुभाव’ सर्वच पक्षांसाठी राजकीय समीकरणांची पुन्हा जुळवाजुळव करायला लावणारा ठरू शकतो!

शनिवारी ५ जुलै रोजी मुंबईच्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंनी हाक दिलेला मराठी भाषा विजयाचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पहिलीपासून हिंदीसक्ती करणारा राज्य सरकारचा आदेश मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ओढवली. त्याचा जल्लोष करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र, त्यातून मराठीच्या जल्लोषासोबतच ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचाही जल्लोष पाहायला मिळाला. अर्थात, हे एकत्रीकरण ‘कौटुंबिक बंधुभावा’चं असेल की ‘राजकीय तडजोडीं’चं, ते आगामी काळात कळेलच. पण या मेळाव्यातील दृश्य ही महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना राजकारणाचा सारीपाट पुन्हा मांडायला लावणारी होती हे नक्की!

मेळावा सर्वपक्षीय, पण व्यासपीठावर फक्त राज-उद्धव!

मेळाव्यासाठी हाक सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते आणि तमाम मराठीजणांना दिली असली, तर पूर्ण कार्यक्रमात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन बंधूच व्यासपीठावर दिसून आले. कार्यक्रमाच्या शेवटी समोर पहिल्या रांगेत बसलेल्या इतर पक्षीयांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्यासह ‘मराठीची युती’ झाल्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. पण यामुळे या मेळाव्यातून ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याचा संदेश प्रखरपणे अधोरेखित झाला.

जर दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर अनेक समीकरणं नव्याने मांडली जातील. याचा सत्ताधारी महायुतीच्या गटात जसा परिणाम दिसू शकतो, तसेच विरोधातील महाविकास आघाडीमध्येही पडसाद उमटू शकतात. त्यामुळे या मेळाव्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहेत. कुणी दोन्ही ठाकरेंवर टीका करतंय, तर कुणी फक्त उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतंय.

शिंदे गटासमोर मोठं आव्हान!

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम होण्याची शक्यता आहे ती शिंदे गटावर. बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंना आता बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि त्यांच्या राजकीय मुशीत तयार झालेला पुतण्या यांच्याशी त्या वारशासाठी थेट दोन हात करावे लागतील. शिवाय, मोठ्या प्रमाणावर मराठी मतदारांमध्ये ठाकरे घराण्यासाठी असणाऱ्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळेही शिंदे गटाला त्यांच्या धोरणात मोठा बदल करावा लागू शकतो.

ठाकरे घराण्यातील दोन्ही भावंडं आणि त्यांची दोन्ही मुलं एकत्र येत असताना एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडेच आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचं मोठं आव्हान असेल. वरळीतील कार्यक्रमानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबानं केलेल्या एकत्र फोटोसेशनमधून बाळासाहेबांचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडेच असल्याचा संदेश देण्याचा हेतू असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हे आव्हान शिंदे गटाच्या चिंता वाढवणारं ठरू शकतं. मराठी प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंच्या व्होटबँकेला यातून मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. विशेषत: ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरी मराठी मतदारांमध्ये याचे उमटणारे पडसाद सत्ताधारी महायुतीसह शिंदे गटासाठीही आव्हानात्मक असतील.

शनिवारी वरळी डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबाचं एकत्र फोटोसेशन (फोटो – अमित चक्रवर्ती)

पक्षाची ताकद सांभाळण्याचं आव्हान

दरम्यान, ज्या मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष उभा केला, त्याच शिवसेनेचं ठाकरे बंधूंच्या रुपात पुन्हा एकत्रीकरण झाल्यास एकनाथ शिंदेंसमोर पक्षाचं कॅडर सांभाळणं हे एक मोठं आव्हान ठरू शकेल. शिवसेनेच्या मुळाशी असणारी बांधिलकी असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते ठाकरे बंधूंच्या नव्या युतीकडे आकर्षित होणार नाहीत, यासाठी एकनाथ शिंदेंना अधिक सतर्कपणे पावलं उचलावी लागतील.

महायुतीतील स्थान…

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपाबरोबर आहे. त्या सत्ताबदलानंतर गेल्या पाच वर्षांत अनेक निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या. मधल्या काळात अजित पवारांचा गटही सरकारमध्ये सामील झाला आणि भाजपासाठी शिंदे गटाबरोबरच आणखी एक ‘पर्याय’ सत्तेत आला. आता ठाकरे बंधूंचं एकत्रित आव्हान उभं राहिल्यास त्याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये भाजपाकडून युतीची वेगळी समीकरणं मांडली गेल्यास एकनाथ शिंदेंसाठी युतीच्या सत्तेतील आपलं स्थान कायम ठेवणं हेही एक आव्हान म्हणून उभं राहू शकतं.

शहरी भागात थेट भाजपाचंच आव्हान?

शहरी भागातील भाजपाच्या प्रभावामुळे एकनाथ शिंदेंना आपला पक्ष अशा ठिकाणी विस्तारताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. विशेषत: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं मिळवलेल्या ऐतिहासिक यशामुळे महायुतीमधील राजकीय समीकरणंही बदलल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेकांच्या मते पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं महायुतीतील प्राबल्य कमी करण्यासाठी भाजपाकडूनच ठाकरे बंधूंना पडद्याआडून बळ दिलं जाण्याची शक्यता आहे.

अस्तित्वातही न आलेल्या युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न?

दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मोठी राजकीय चर्चा चालू असली, तरी अद्याप त्यांच्या युतीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. मात्र, त्याआधीच या युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. शनिवारच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे गटानं दिलेली प्रतिक्रिया यासाठी उदाहरण म्हणून दिली जात आहे. “एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा”, अशी पोस्ट शिंदे गटानं केली असून यातून राज ठाकरेंचं कौतुक आणि फक्त उद्धव ठाकरेंवरच टीका केल्याचं स्पष्ट होत आहे.

ठाकरेंची युती भाजपाला आव्हान देणार का?

गेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १३२ जागा स्वबळावर जिंकल्यानंतर भाजपानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं आहे. या निवडणुकीतील आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रातील २६.७७ टक्के मतं आहेत. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसला मतं मिळाली असली, तरी काँग्रेसपेक्षा भाजपाची मतं जवळपास दुप्पट आहेत. काँग्रेसला १२.४२ टक्के मतं मिळाली आहेत. पण ठाकरेंच्या युतीमुळे भाजपाच्या या मराठी व्होटबँकेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या शहरी व निमशहरी भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या भागात ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतांच्या टक्केवारीत थोडा जरी बदल झाला, तरी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये भाजपाला त्याचा फटका बसू शकतो. विशेषत: मुंबई महानगर पालिका निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केलेली असताना!

पालिका गमावल्यास विधानसभेला फटका?

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपाच्या पालिका निवडणुकांमधील कामगिरीवर परिणाम झाल्यास सत्ताधारी पक्षासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. यामुळे शहरी भागातील व्होटबँकेचं गणित मोठ्या प्रमाणावर बदल शकतं. या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला चांगलं यश मिळाल्यास २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला या युतीचं मोठं आव्हान उभं राहू शकतं.

भाजपाचं ‘हिंदुत्व’ विरुद्ध ठाकरेंचं ‘हिंदुत्व’+’मराठी’

एकीकडे उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा आणि दुसरीकडे राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका या दोन्ही गोष्टींचा एकत्रित सामना करताना भारतीय जनता पक्षाला नव्याने राजकीय समीकरणं मांडावी लागू शकतात. प्रामुख्याने शहरी व निमशहरी भागातील मराठी मतदार ठाकरेंच्या मागे जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी भाजपाला वेगळं धोरण राबवावं लागू शकतं, असं सांगितलं जात आहे.

भाजपाचं ‘राज’प्रेम!

भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंतच्या राजकीय चर्चांमध्ये नेहमीच राज ठाकरेंना झुकतं माप दिल्याचं दिसून आलं आहे. मराठी भाषेचा मुद्दा तापण्याआधी भाजपाच्या नेत्यांच्या राज ठाकरेंशी झालेल्या गाठीभेटीही चर्चेचा विषय ठरल्या होत्या. विजयी मेळाव्यानंतरदेखील एकनाथ शिंदेंप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना राज ठाकरेंविषयी मात्र टीका करणं टाळल्याचं दिसून आलं.

“मला सांगण्यात आले होते, की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी तर रुदालीचे भाषण झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता. हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होती. मुळात त्यांना त्रास याचा आहे, की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करू शकले नाहीत”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

अमराठी व्होटबँक भाजपाच्या पाठिशी?

दरम्यान, एकीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास शिंदे गट व भाजपाकडे असणाऱ्या मराठी व्होटबँकेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे ही युती झाल्यास अमराठी व्होटबँक त्यांच्यापासून लांब जाऊन भाजपाच्या पाठिशी जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्याशिवाय, जर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या युतीनं एकनाथ शिंदे गटाला धक्का दिल्यास महायुतीमध्येदेखील भाजपाचं वर्चस्व आणखी वाढू शकतं.

काँग्रेससमोरचा पेच

हिंदुत्व आणि मराठी राजकारणाच्या मुद्द्यांभोवतीच महायुती व महाविकास आघाडी यांचं सध्याचं राजकारण फिरताना दिसत असताना काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. जर राज ठाकरे विरोधकांच्या फळीमध्ये दाखल झाले, तर त्यांच्यासोबत विरोधकांच्या आघाडीत राहायचं की नाही? या प्रश्नाचं निश्चित उत्तर काँग्रेसला शोधावं लागेल. अजूनपर्यंत तरी काँग्रेसनं या मुद्द्यावर सोयीस्कर मौन बाळगलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमराठी नागरिकांबाबत राज ठाकरेंच्या पक्षाची आक्रमक भूमिका आणि मुस्लिमविरोधी राजकारण यामुळे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसण्याची रास्त शंका काँग्रेसला वाटते आहे. विशेषत: महाराष्ट्राबाहेर काँग्रेसला या आघाडीचा फटका बसू शकतो. मनसेसारख्या पक्षाशी केलेली आघाडी कशी योग्य आहे, हे महाराष्ट्राबाहेर पटवून देताना काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लाहू शकतो. त्यामुळे काँग्रेसकडून राज ठाकरेंबाबत सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आल्याचं दिसून येत आहे.