आगामी काही महिन्यांत राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अशोक गेहलोत यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. दरम्यान, येथे काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे भाजपाने २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत एकूण चार परिवर्तन यात्रांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या यात्रांचे नेतृत्व केंद्रीय नेतेच करणार आहेत.
राजस्थानमधील यात्रेत दिल्लीचे नेते
राजस्थानमधील गटबाजीला आळा बसावा यासाठी या यात्रांचे नेतृत्व सध्या तरी केंद्रातील नेतेच करणार आहेत. भाजपामध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. त्यासाठी अनेक नेते आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. राज्यातील नेत्यांच्या याच महत्त्वाकांक्षेला आळा बसावा, तसेच दिल्लीचे नेतृत्व राज्यातील कोणत्याही एका नेत्याला महत्त्व देत नाही, हा संदेश जावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांनादेखील या यात्रांपासून काहीसे दूर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेते या यात्रांमध्ये दिसतील.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक नेते
सध्या राजस्थानमधील अनेक नेते मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा बाळगून आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यापासून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन राम मेघवाल, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड या नेत्यांचा समावेश आहे. यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे खासदार किरोडी लाल मीना व प्रदेशाध्यक्ष जोशी हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. असे असले तरी केंद्रीय नेतृत्व सध्या तरी राजस्थानमधील कोणत्याही एका नेत्याला महत्त्व देत नाही.
आगामी निवडणुकीसाठी भाजपा आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची शक्यता आहे. त्यासह राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आलीच तर प्रसिद्ध नसलेल्या नेत्याचीदेखील मुख्यमंत्रिपदी निवड केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. राज्यातील कोणत्याही एका नेत्याला महत्त्व न देऊन तेथे पक्षांतर्गत सर्व काही आलबेल आहे, असा संदेश देण्याचाही भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे.
मोदींचे नाव आणि कमळ चिन्हाला समोर ठेवूनच निवडणूक लढवणार
भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमळ हे पक्षाचे चिन्ह समोर ठेवूनच राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याचाच अर्थ या निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच प्रमुख चेहरा राहतील, अशी रणनीती भाजपाकडून आखली जात आहे. असे असले तरी निवडणूक जवळ आल्यानंतर वसुंधरा राजे यांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थक नेत्यांना आहे.
दरम्यान, भाजपाने आयोजित केलेली ही परिवर्तन यात्रा राजस्थानमधील सर्वच २०० मतदारसंघांतून जाणार आहे. साधारण २० दिवस ही यात्रा असेल. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे.