दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे बिगुल वाजवले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी निवडणूक लढवण्याबाबत पुढचे पाऊल टाकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दोन दिवशीय परिषद राजू शेट्टी यांना प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य देणाऱ्या शाहुवाडी तालुक्यात पार पडली. येथेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

हेही वाचा… लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव दाखल करणार? विरोधकांची भूमिका काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही जागा, शेजारचा सांगली, माढा, परभणी व बुलढाणा या सहा जागा स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. गेल्यावेळी स्वाभिमानीने हातकणंगले व सांगली या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढवली होती. आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आहे. याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि बहुजन विकास आघाडी याचबरोबर भारत राष्ट्र समिती या मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित पक्षांच्या नेत्यांशी चर्चाही सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्ष व रासप यांच्याशी स्वाभिमानीचे जुळण्याचे संकेत आहेत. रासपचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला रामराम ठोकला तर त्यांना परभणी किंवा माढा मतदार संघातून उतरवण्याची तयारी स्वाभिमानीने दर्शवलेली आहे.

हेही वाचा… ‘कसब्या’मुळे भाजप सावध, बापट कुटुंबियांना संधी ?

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भूमिका पुन्हा एकदा वादग्रस्त बनली आहे. तुपकर यांनी ‘ राजू शेट्टी यांच्या डोक्यात बुलढाणा मतदारसंघाचे नाव असो की नसो आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय पक्का आहे. आणि आम्ही पूर्ण ताकतीने लढणार आहोत,’ असे विधान केले आहे. शेट्टी यांच्या यादीत बुलढाणा मतदारसंघ असला तरी तो तुपकर यांच्यासाठी सोडला जाणार का याबद्दल स्पष्टता नाही. मुळात हातकणंगले मतदारसंघात शेट्टी वगळता अन्य पाच ठिकाणी कोण उमेदवार असणार याबाबतचे कसलेच संकेत नाहीत. त्यामुळे बुलढाणा मध्ये उमेदवार कोण हेही स्पष्ट होत नाही. यापूर्वी, तुपकर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधून स्वाभिमानीपासून वेगळा मार्ग पत्करलेला होता. कोल्हापूर येथे ओक्टोंबर २०१९ मध्ये पुन्हा एकदा शेट्टी – तुपकर एकत्र आले होते. आता बुलढाणा मतदारसंघावरून त्यांच्यात पुन्हा दुभंग निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : “राज्यात जातीय तणाव निर्माण व्हावा, ही राज्य सरकारची इच्छा”; संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र!

संभाजीराजे छत्रपती आखाड्यात

कोल्हापूरचे छत्रपती घराण्यातील वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी यांनी सुद्धा एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे. त्यांनी गतवर्षी मे महिन्यात स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. आता स्वराज्य संघटना राजकीय मैदानात उतरवण्याचे तयारी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. नवी मुंबई येथे संघटनेची नुकतीच जाहीर सभा झाली. त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप विधान केलेले नाही. सात वर्षांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा सदस्य बनवले होते. दुसऱ्यांदा संधी न मिळाल्याने त्यांचे भाजप, उद्धव ठाकरे शिवसेनेसह कोणत्याच पक्षाशी सूर जुळलेले नाहीत. त्यामुळे त्यांची एकाकी भरारी कितपत उंच जाणार हेही लक्षवेधी बनले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty chhatrapati sambhaji raje starts preparations for lok sabha elections print politics news asj
First published on: 30-03-2023 at 11:28 IST