मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक न्याय मंत्री या नात्याने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडली. दलित मुद्यांवर भाजपला जेव्हा जेव्हा सवाल केले गेले, तेव्हा तेव्हा मी भूमिक घेऊन मैदानात उतरलो. त्यामुळे मला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद दिले आहे, असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- अ (रिपाइं) पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

‘माझी राज्यसभेतली भाषणे काढून पाहा, काँग्रेसने सामाजिक न्यायासंदर्भात केलेले आरोप मी खोडून काढले आहेत. पाच वर्षात माझा पक्ष मी देशभर नेला. अंदमान मध्ये सुद्धा रिपाइं आहे. मोदी हे दलितविरोधी नाहीत, हे मी ठामपणे सांगितले. माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. मोदींशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ म्हणून मला दुसऱ्यांदा आमच्या पक्षाचा एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रीपद मिळाले असल्याचे आठवले म्हणाले.

आणखी वाचा-तृणमूल आणि डाव्यांच्या मध्ये काँग्रेस कोंडीत; पश्चिम बंगालमधील अस्तित्वासाठी काँग्रेस काय घेणार भूमिका?

मला जर शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी दिली असती तर ती जागा महायुतीला मिळाली असती, त्याबरोबरच दक्षिण अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे -पाटील यांचासुद्धा पराभव झाला नसता, असा दावा त्यांनी केला. दक्षिण -मध्य मुंबई मतदारसंघात दलित मतदार बहुसंख्य आहेत, मात्र संविधान बदलाची त्यांना भीती दाखवण्यात आली, परिणामी, महायुतीचे राहुल शेवाळे दलित उमेदवार असतानाही त्यांचा पराभव झाला, असे भाष्य त्यांनी केले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं १० जागांची महायुतीकडे मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले. रिपाईचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत ४०० पारच्या नाऱ्याला घाबरुन दलित मतदार लोकसभेला काँग्रेसकडे वळला.पण, दलितांना काँग्रेसविषयी ममत्व आहे असे नाही. मात्र मोदी नको, इतकेच दलितांचे या लोकसभेला म्हणणे होते. मात्र विधानसभेला हे चित्र बदलेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. प्रकाश आंबेडकर हे आल्याशिवाय रिपाइं गटाचे एकीकरण होऊ शकत नाही. रिपाइं एकीकरणाचा पोपट मेला आहे, असे प्रकाश आंबेडकरांनीनी पूर्वीच जाहीर केलेले आहे. राज्यात दलित मतांचा टक्का जेमतेम ७ टक्के आहे. उमेदवार विजयी होण्यास किमान २५ ते ३० टक्के मते आवश्यक असतात, असे सांगून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढणार असतील तर त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला काही भविष्य नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.