पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर या ऑपरेशनबाबत विरोधकांकडून जसा पाठिंबा मिळाला तसे काही प्रश्नदेखील उपस्थित केले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरबाबत आपला संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले. त्यामध्ये सर्व पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. या संदर्भात भाजपाचे ज्येष्ठ खासदार व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असताना पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत…

  • पाकिस्तान आणि ऑपरेशन सिंदूरबाबत आपला संदेश पोहोचवण्यासाठी सरकारला जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवणं का आवश्यक वाटलं?

पहलगाम हल्ल्यानंतरही भारत एकजूट राहिला. भारताची ही एकता जगभरातील नेत्यांसमोर यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते. या शिष्टमंडळांत केवळ भाजपा खासदारच नव्हेत, तर विविध राजकीय पक्षांचे खासदार व नेत्यांचाही समावेश आहे. माझ्याव्यतिरिक्त माझ्या शिष्टमंडळात फक्त बैजयंत पांडा भाजपाचे आहेत; बाकीचे इतर राजकीय पक्षांचे सदस्य आहेत.

  • ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय पाठिंबा न मिळाल्याने भारताला अपयश आल्याने या मोहिमा सुरू झाल्या, असा दावा काही विरोधकांनी केला आहे…

ज्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. अलीकडेच फ्रान्सच्या एका संसदीय शिष्टमंडळानं भेट दिली. आम्ही त्यांना भेटलो, त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की, परिस्थिती तणावपूर्ण असली तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आमच्याकडे संयुक्त राष्ट्रांचा ठराव आहे आणि सर्व नेत्यांनी पंतप्रधान किंवा परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून याबाबत मत व्यक्त केलं आहे. मला माहीत नाही की, हा संपूर्ण युक्तिवाद का केला जात आहे की, फक्त दोन देशांनी भारताला पाठिंबा दिला? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आखाती देश, सौदी अरेबिया, यूएई, कतार वआणि कुवेत या सर्वांनी पाठिंबा दिला आहे. परराष्ट्रमंत्र्यांशी किंवा पंतप्रधानांशी बोलून त्यांनी चिंता आणि एकता व्यक्त केली.

  • तुम्ही जागतिक नेत्यांसोबत कोणत्या प्रकारचे पुरावे शेअर कराल?

पाकिस्तानमध्ये लष्करी आस्थापना आणि दहशतवाद्यांमधील समन्वयाची रेषा पूर्णपणे अस्पष्ट आहे. याचं हास्यास्पद उदाहरण म्हणजे अपयशी ठरलेल्या जनरल असिम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती देण्यात आली आहे. तिथे लष्कराने अशीच पकड ठेवली आहे.) १९४८ पासून आपण चार मोठ्या युद्धांना तोंड दिलं आहे- १९६५, १९७१, १९९९ मधील कारगिल युद्ध आणि त्यानंतर हजार कटांचा सिद्धांत. संसदेवर हल्ला असो, मुंबईवर हल्ला असो, उरी, पुलवामा असो किंवा आता पहलगाम असो, सर्व पाकिस्ताननंच केलंय. आपल्याला शांतता हवी आहे; पण हत्येच्या किमतीवर नाही.

  • पुराव्यांबाबत काय सांगाल?

भारतानं उपग्रह प्रतिमा आणि कारवाई केलेल्या ठिकाणांची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहेत. भारतानं निर्णायकपणे आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. सुरुवातीच्या अहवालांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीही भारतानं शेअर केलेल्या पुराव्यांमुळे निष्पक्षपणे वृत्त दिले. द न्यूयॉर्क टाइम्स असो किंवा द वॉशिंग्टन पोस्ट सर्वांनीच खरीखुरी परिस्थिती स्पष्टपणे मांडली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की ऑपरेशन सिंदूर ही एक नवीन सामान्य घटना आहे. हाच संदेशाचा मुख्य उद्देश असेल का? त्याचा इतर देशांशी असलेल्या आपल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो का?

यातला पहिला मुद्दा म्हणजे दहशतवाद हा एक जागतिक शाप आहे आणि भारत याचा एकमेव बळी नाही. फ्रान्समध्ये हल्ला झाला, ब्रुसेल्समध्ये लोक मारले गेले. लंडनमध्ये हल्ला झाला, अमेरिकेत ९/११ झाला. सर्व हल्ल्यांमध्ये संशयाची सुई आपल्याला कुठे घेऊन गेली? केवळ पाकिस्तानात. अबोटाबादमध्ये मारल्या गेलेल्या ओसामा बिन लादेनपासून पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येपर्यंत…
दुसरा मुद्दा असा की, आता पुरे झालं. भारतानं पाकिस्तानबरोबरचे प्रश्न राजनैतिकरीत्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये त्यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यात नवाज शरीफ यांना फोन केला होता.पण हाती काय लागले? जर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ आणि तेही बिनचूक प्रत्युत्तर देऊ आणि दहशतवादी छावण्या नष्ट करू, जे केलंच आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तरुण विवाहित जोडप्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यास सांगितले आणि नंतर त्यांच्या पतीची डोळ्यांदेखत हत्या केली. हे अनाकलनीय आहे आणि हे आता भारत सहन करणार नाही. आम्ही दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. पण, जेव्हा पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला तेव्हा आम्ही त्यांचे नऊ ते १० हवाई तळ उद्ध्वस्त केले. आज मी आणखी एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो, ती म्हणजे भारताचे सामर्थ्य. आम्ही आमची हवाई संरक्षण प्रणाली अशा प्रकारे स्थापित केली आहे की, आम्ही आमच्या सीमांचं रक्षण करू शकतो. सरकारनं मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करून, लष्कराच्या गरजांकडे लक्ष दिलं आणि आता आमच्या सैन्यानं त्याचे निकाल दिले आहेत.

  • परराष्ट्र सचिवांनी सर्व शिष्टमंडळांना माहिती, कागदपत्रं दिली. तुम्ही कोणता संदेश देणार आहात?

ही माहिती गोपनीय राहू द्या. मात्र, आम्ही युरोपीय देशांना हा संदेश देत आहोत की, युरोपसह जगानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याची वेळ आली आहे. दहशतवाद कोणत्याही धर्माची ओळख नाही; तो लोकशाहीविरोधी आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पीडितांच्या मानवी हक्कांचे काय?… हे सर्व योग्यरीत्या मांडलं गेलं पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • राजकीय एकजुटीच्या या चर्चेदरम्यान, तुमच्या पक्षानं लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे आणि काँग्रेसनं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना लक्ष्य केलं आहे.

मला याबाबत बोलायचं नाही. सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्रितपणे या सहमतीच्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. मी त्यांची विधानं पाहिली आहेत, सलमान खुर्शीद ते मनीष तिवारी या वरिष्ठ नेत्यांची… थरूर तर आधीच होते.
मला राजकीय मुद्दा मांडायचा नाही; परंतु राहुल गांधींबद्दल मी फक्त एकच गोष्ट सांगेन. ते आता विरोधी पक्षनेते आहेत. हे एक अतिशय जबाबदार पद आहे. मी त्यांना फक्त एकच सल्ला देईन की, पाकिस्तानला चघळण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मुद्दा कशाला द्यायचा? तुम्हाला वाटत नाही का की, संपूर्ण जगानं भारताची भूमिका स्वीकारण्याची वेळ आली आहे? ज्याला योग्य पुराव्यांनी पाठिंबाही दिला आहे? कृपया, तुम्ही तुमची विधानं आणि विचार यांबाबत पुन्हा विचार करावा.