माणिकराव कोकाटे यांची सभागृहात रमी खेळतानाच चित्रफीत असो, पुण्यात तीन युवतींची तक्रार दाखल करून घेण्यास नकार देण्यावरून पोलीस ठाण्यातील आंदोलन, भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी झालेली शिफारस वा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राने रॅपिडोचे घेतलेले प्रायोजकत्व या साऱ्या प्रकरणांमध्ये आरोप करण्यात किंवा आवाज उठविण्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार) नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार हे आघाडीवर होते. यातूनच जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच रोहित पवार अचानक आक्रमक कसे झाले याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी प्रदेश सरचिटणीसपदी आमदार रोहित पवार यांची नियुक्ती झाली. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदास सात वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वात प्रथम रोहित पवार यांनी गेल्या वर्षी केली होती. तेव्हापासून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती. शेवटी जयंत पाटील यांना बदलून शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका मांडण्यात कमी पडतो, अशी भावना गेल्या वर्षी रोहित पवार यांनी बोलून दाखविली होती.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडताच रोहित पवार यांनी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची चित्रफीत माध्यमांसमोर मांडली. त्यात विधान परिषद सभागृहात कोकाटे हे भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दुसऱ्या दिवशी कोकाटे यांच्या खेळतानच्या आणखी तीन चित्रफिती रोहित पवार यांनी माध्यमांना दिल्या. यावरून बराच गदारोळ झाला. शेवटी कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आले. कोकाटे यांचे कृषि खाते काढून घेण्यात रोहित पवार यांनी उघड केलेली चित्रफीत कारणीभूत ठरली. हा एक प्रकारे रोहित पवार यांचा विजय होता.
गेल्या आठवड्यात तीन विविध प्रकरणांमध्ये रोहित पवारांनी सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जोरकसपणे भूमिका मांडली. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन युवतींच्या तक्रारीच दखल घेण्यात आली नाही. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबियांबरोबरच रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी शिफारस करण्यात आली. त्या विरोधात रोहित पवार आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीच आवाज उठविला. रोहित पवार यांनी सतत दोन दिवस न्यायमूर्तींच्या शिफारसीचा मुद्दा लावून धरल्याने भाजपला त्यावर खुलासा करावा लागला. तसेच साठे यांच्याकडून निष्पक्ष न्यायदानाची अपेक्षा नसल्याने त्यांच्या निवडीवर फेरविचार करण्याची मागणी केली.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राच्या प्रो-गोविंदा कार्यक्रमासठी ‘रॅपिडो’चे प्रयोजकत्व स्वीकारण्यात आले. त्यावरून रोहित पवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. यावरून प्रताप सरनाईक यांच्या खुलासा करण्याची वेळ आली.
अचानक आक्रमक
रोहित पवार हे २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. गेल्या सहा वर्षांत ते तेवढे आक्रमक दिसत नव्हते. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात कमी पडतो, अशी खंत त्यांनी मध्यंतरी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजप आणि महायुतीवर दररोज आरोप करतात. त्यावर भाजपला प्रततिक्रिया वा खुलासा करावा लागतो. आता रोहित पवार यांनीही आक्रमक विरोधी नेता अशी स्वत:ची प्रतिम तयार करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.