Rohit pawar on Marathwada flood मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी मराठवाडा भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. लातूर, धाराशिव, बीड व परभणी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक भागांत खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. विरोधक त्यावरून सातत्याने सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसत आहेत. सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदत किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार नक्की काय म्हणाले? वादाचे नेमके कारण काय? मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधक सरकारवर काय आरोप करीत आहेत? जाणून घेऊयात…

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी मदत किटचा फोटो शेअर करीत लिहिले, “अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवरील एकनाथ शिंदेसाहेब आणि ‘रॅपिडो’फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोंची साईज खूप लहान असून, यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत. म्हणजे लोकांच्या डोळ्यांतले दुःखाश्रू थांबतील आणि लोक फोटो बघून आनंदाने हसतील.”

सरकारवर संतापले विरोधक

यापूर्वी रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “मुख्यमंत्र्यांनी २,२०० कोटीची मदत केली असल्याचे सांगितले; परंतु मदत कोणत्या दराने दिली हेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे. ३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७,००० रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८,५०० प्रति हेक्टर म्हणजेच ३,४०० रुपये एकरी याप्रमाणे देण्यात आली.”

रोहित पवार पुढे म्हणाले, “एकरी ३,४०० रुपयांत काय होणार आहे? तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखांचा आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३,४०० रुपयांची मदत. एवढ्या आलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रु. मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासनं नकोत, तर सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,” असे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. जनतेचा आक्रोश सरकारदरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षनेता करत असतो. राज्याला दोन-दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत; पण विरोधी पक्षनेता नाही! ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे,” असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, लोक मरत आहेत, आक्रोश चाललाय. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोक मदत किटवर आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून, राजकारण करीत आहेत. अशा प्रकारचे राजकारण करणे म्हणजे निर्लज्जपणा आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून, कोणतीही शहानिशा न करता, शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तत्काळ जमा करावेत. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करू नये. केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी.” सरकारने स्वत:च्या जाहिरातबाजीवर पैसे उधळण्याऐवजी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना लगावला.

“मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती; पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिके डोळ्यांदेखत पाण्यात गेली आहेत. जमीन वाहून गेल्यानं रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. गुरंढोरं वाहून गेली, रस्ते वाहून गेलेत. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे, त्यातून ते कसे सावरणार? केंद्रानं तातडीनं किमान१० हजार कोटींची मदत जाहीर करावी,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले, “अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी आहे. लोकांना मदत होणं गरजेचं आहे. अनेकजण अंगावरच्या कपड्यांवर घराबाहेर पडलेत, उघड्यावर आले आहेत. त्या आपल्या बांधवांना आणि भगिनींना मदत करणं, कपडे देणं, जीवनावश्यक वस्तू पुरवणं, धान्य व भांडी पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे. ती मदत करताना त्यात राजकारण आणता कामा नये. त्यामुळे सर्वांनी या पूरग्रस्तांना करता येईल तेवढी मदत करावी. कारण आपल्यासमोर अस्मानी संकट उभं ठाकलं आहे. सर्वांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धाऊन जाऊया.”