” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, मुघलांची आणि ब्रिटिशांची सत्ता यावर भाष्य केले. मुघलांनी कित्येक वर्षे भारतावर राज्य केले. मात्र, या काळात भारतीय लोक हे त्यांच्यापेक्षा कमी आहेत, असे त्या काळातील भारतीय विचारवंतांना वाटले नव्हते. ब्रिटिशांनी अवघे १५० वर्षे भारतावर राज्य केले. मात्र या काळात विचारवंतांना ब्रिटीश लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असे वाटू लागले. आपण स्वत:चाच द्वेष करत होतो,” असे होसबळे म्हणाले.

“आपण मुघलांविरोधात लढा दिला, मात्र..”

“आपल्याला जगात स्थान आहे का? आपण या जगाला काहीच दिलेले नाही का? की आपण या जगाला वेगवेगळ्या कल्पना देणारे आहोत? आपण साधारण एक हजार वर्षे संघर्ष केलेला आहे. लढा दिलेला आहे. आपण मुघलांविरोधात लढा दिला. या लढाईत आपण कित्येकदा पराभूत झालो. मात्र, या काळात आपण बाहेरचे आहोत. ते आपल्यापेक्षा सरस आहेत. अधिक सुसंस्कृत आहेत किंवा वंशाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत, असे तेव्हाच्या विचारवंतांना वाटत नव्हते. मात्र, ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या सत्तेच्या काळात परिस्थिती वेगळी होती. त्या काळात भारतातील विचारवंतांना ब्रिटीश आपल्यापेक्षा सरस आहेत, असे वाटत होते. तेव्हाचा बुद्धिजीवी वर्ग भारतातील लोक ब्रिटिशांपेक्षा लहान आहेत, हुशार नाहीत, सुसंकृत नाहीत; आपण या जगाला काहीही दिलेले नाही असे मानायचा. ब्रिटीश राजवटीत आपण भारतीय स्वत:चाच द्वेष करत होतो,” असे सहकार्यवाह म्हणाले.

होसबळे यांनी लिहिली पुस्तकाची प्रस्तावना

राज्यसभेचे माजी सदस्य बलबीर पुंज यांनी लिहिलेल्या ‘नरेटिव्ह का मायाजाल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात दत्तात्रेय होसबळे बोलत होते. होसबळे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या कथनांमुळे (नरेटिव्ह) देशाच्या संकृतीत काय बदल होऊ शकतो यावर भाष्य केलेले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान तसेच वकील आणि स्तंभलेखक जे. साई दीपक हेदेखील वक्ते म्हणून उपस्थित होते.

“भारतीयांनी स्वत:चा अपमानदेखील स्वीकारला”

होसबळे यांनी ब्रिटीश राजवटीत भारतीयांनी स्वत:चा अपमानदेखील स्वीकारला, असे भाष्य केले. “आपण गुलामगिरीची मानसिकता दर्शवण्याच्या स्पर्धेत उतरलो. कारण काही विद्यापीठे, विचारवंत, आंतरराष्ट्रीय माध्यमे, न्यायव्यवस्था यांच्या माध्यमातून तशा प्रकारचे कथन करण्यात आले. भारत, सनातन, हिंदूंशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टींचा तिरस्कार करण्यात आला. सनातन, हिंदू हे विज्ञानाच्या विरोधात आहेत, मानवताविरोधी आहेत, विकासाच्या विरोधात आहेत, असे कथन करण्यात आले,” असे होसबळे म्हणाले.

“कोणालाही संस्कृत भाषा शिकण्यात रस नाही”

”भारत देशाला समजून घ्यायचे असेल, तर अगोदर संस्कृत भाषेला समजून घ्यायला हवे,” असेही होसबळे म्हणाले. “कोणालाही संस्कृत भाषा शिकण्यात रस नाही. लोक म्हणतात की, ही मृतभाषा आहे. तसेच ही फक्त ब्राह्मणांची भाषा आहे. ही शोषणाची भाषा आहे, असे अनेकजण म्हणतात. मागील १५० वर्षांपासून अशा प्रकारचे दावे केले जातात. याच कारणामुळे संस्कृत भाषेला हटवण्यात आहे,” असे होसबळे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“… हा समज खोडून काढला पाहिजे”

शेवटी होसबळे यांनी पुस्तके भारतीय भाषांतच लिहायला हवीत, असे मत व्यक्त केले. ”एखाद्याला भारतीय लोकांना भारताविषयी सांगायचे असेल, तर ती भाषादेखील भारतीयच असायला हवी. आपल्या देशात आपण इंग्रजीमध्ये लिहित असू, तेव्हाच तुम्हाला विचारवंत समजले जाईल. अशा प्रकारचा समज खोडून काढायला हवा. त्यामुळे लोकांनी हिंदी भाषेत लिहायला हवे,” असे प्रतिपादन होसबळे यांनी केले.