Urdu Press Says RSS should defend Muslim Rights : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागून आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये देशातील काही उर्दू वृत्तपत्रांनी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. मुंबईतील ‘उर्दू टाइम्स’ या दैनिकाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणारा लेख छापला आहे, तर दिल्लीतील ‘इन्कलाब’ वृत्तपत्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लिमांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही वृत्तपत्रांमधील संपादकीय लेखात नेमकं काय म्हटलंय? त्याबाबत जाणून घेऊ…
उर्दू टाइम्सच्या लेखात सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेध
मुंबईतील ‘उर्दू टाइम्स’ या वर्तमानपत्राने ७ ऑक्टोबरच्या आपल्या अग्रलेखात सर्वोच्च न्यायालयातील धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध केला. न्यायपालिकेला कायद्याचे रक्षक आणि न्यायाचे मंदिर मानले जाते. अशा ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे देशातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. या कृत्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमादेखील मलीन झाल्याचे उर्दू टाइम्सने आपल्या लेखात म्हटले. दलित समुदायातून आलेले सरन्यायाधीश गवई यांच्या विधानामुळे सनातन धर्माचा अपमान झाल्याचा सदरील वकिलाने आरोप केला. या घटनेमुळे जातीय भेदभावाचे कुरूप पुन्हा एकदा समोर येत असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
उर्दू टाइम्सने केले सरन्यायाधीश गवई यांचे कौतुक
“महात्मा गांधींनी जातीय भेदभावाविरोधात लढा दिला; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून तो संपवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील आज हा धोका कायम असून अलीकडच्या काळात त्याला अधिकच खतपाणी घातले जात आहे,” अशी चिंताही उर्दू टाइम्सच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या घटनेला अत्यंत संयमाने हाताळले होते. या निंदनीय घटनेकडे दुर्लक्ष करून त्यांनी न्यायालयातील प्रकरणाची सुनावणी सुरूच ठेवली होती. इतकेच नाही तर, हल्लेखोर वकिलावर कोणतीही कारवाई नका आणि त्यांना सोडून द्या, असे निर्देशही त्यांनी न्यायालयाच्या नोंदणी विभागाला दिले होते, सरन्यायाधीशांच्या या भूमिकेचे अग्रलेखात कौतुक करण्यात आले आहे.
वकिलाची सनद रद्द केल्याने मानले आभार
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करण्यात आली. त्याबाबत उर्दू टाइम्सने बार कौन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानले. “सरन्यायाधीशांनी या घटनेनंतर मोठेपणा दाखवून समाजात एक शक्तीशाली संदेश देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही दोषी वकिलावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी,” अशी मागणीही या अग्रलेखातून करण्यात आली. द्वेषाच्या विषाला प्रेमाच्या अमृतात कसे रूपांतरित करायचे हेच आपल्यासमोरील खरे आव्हान असल्याचे नमूद करत या अग्रलेखाची सांगता करण्यात आली.
आरएसएसच्या दसरा मेळाव्याबाबत ‘इन्कलाब’ने काय म्हटले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील संघ मुख्यालयात झालेल्या दसरा मेळाव्यातून सामाजिक सलोखा आणि जबाबदारीचा संदेश दिला. या मेळाव्याकडे नवी दिल्लीतील ‘इन्कलाब’ या उर्दू वर्तमानपत्राने लक्ष वेधले. “भारतीय संविधान हे समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित आहे. संविधानाने प्रत्येकाला धर्म, वर्ग, जात, प्रदेश किंवा भाषेचा विचार न करता समान अधिकार दिलेले आहेत. मात्र, जेव्हा हे हक्क केवळ कागदावर राहतात आणि प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होत नाही, तेव्हा त्याचा देशाच्या नैतिक मूल्यावर मोठा परिणाम होतो,” असे इन्कलाबच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिमांचे संरक्षण करावे’
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्राचा समर्थक असला तरी स्वयंसेवक नेहमीच सामाजिक ऐक्य आणि बंधूता जपण्याचे काम करतात. मात्र, त्यांच्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये अंतर दिसून येत आहे. अलीकडील काही वर्षांत देशातील कानाकोपऱ्यात मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये गोहत्या आणि अतिरेकी कारवायांच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा घटनांचा निषेध करून मुस्लीम समुदायाच्या हक्काचे संरक्षण करायला हवे,” असा सल्ला इन्कलाबच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील घटनेचाही केला उल्लेख
‘आय लव्ह मोहम्मद’ पोस्टर प्रकरणावरून झालेले आंदोलन आणि अटकेच्या घटनेचाही इन्कलाबच्या या अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे. “सरकारने अशा घटनांची निष्पक्ष चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून द्यायला हवा. जर त्यात ते अपयशी ठरले, तर संविधानाचा आणि कायद्याचा पाया कमकुवत होऊन सामाजिक दुफळी निर्माण होईल,” असा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शब्दात आणि कृतीत सुसंगती आणली पाहिजे. संघाचा जर राष्ट्रीय एकात्मतेला खरोखरच पाठिंबा असेल, तर त्यांनी मुस्लिमांचे संरक्षण केले पाहिजे,” असेही इन्कलाबच्या आपल्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : Asaduddin Owaisi : ‘भाजपाला पराभूत करायचे असेल तर…’ ओवैसींचा महाआघाडीला सल्ला; नेमकं काय म्हणाले?
बिहारमधील मतदारांना शहाणपणा दाखवावा लागेल – सियासत
हैदराबाद येथील ‘सियासत’ या उर्दू दैनिकाने आपल्या ७ सप्टेंबरच्या अग्रलेखातून बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. बिहारमधील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून जागावाटप आणि उमेदवारांची निवड करण्यात व्यस्त असल्याचे सियासतच्या अग्रलेखात म्हटले आहे. “बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांच्या महाआघाडीत थेट लढत होणार असली तरी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीने या निवडणुकीत वेगळीच रंगत आणली आहे. मात्र, राज्यातील गुंतागुंतीच्या राजकारणात ही पार्टी आपल्या पहिल्याच निवडणुकीत उलथापालथ घडवेल याची कमी शक्यता आहे,” असे सियासतच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले. या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मतदारांना वेगवेगळी प्रलोभने आणि आश्वासने दिली जातील. जातीय आधारांवर मतदारांचे ध्रुवीकरण केले जाईल. हिंदू विरुद्ध मुस्लीम ही मांडणी आधीच तयार झाली आहे, त्यामुळे मतदारांना शहाणपणा दाखवावा लागेल, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.