नीरज राऊत / सचिन पाटील

पालघर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी गटाच्या घटक पक्षांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना थेट लाभार्थी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचून निश्चित मतांची बेगामी करण्याचे तंत्र अवलंबले आहे. विविध योजनेतून त्या दृष्टीने अंमलबजावणी होत असून सत्ताकारण असलेल्या घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची मनोर येथे अलीकडेच बैठक घेऊन “पक्षाने आपल्याला सर्व काही दिले असताना आपण पक्षासाठी काय दिले” अशी विचारणा करून कडक भाषेत कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. शिवसेनेने “शिवदूत” नेमण्याची योजना हाती घेतली असताना त्याला पालघर जिल्ह्यातून मिळत असलेल्या अत्यल्प प्रतिसादाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्य व केंद्र सरकारच्या योजना थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी शिबिर घेण्याचा सपाटा लावण्याचे निर्देशित करण्यात आले असून सरकारी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांचे नोंदणी अर्ज भरून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्ष बांधणीच्या दृष्टीकोनातून खेडोपाडी पक्षीय पदाधिकारी दौरे करावे, शाखा उघडाव्यात तसेच बूथ कमिटी स्थापन करावी असे सांगत विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ निहाय शिवदूत नेमण्यासाठी लक्षांक निश्चित करून देण्यात आले.

हेही वाचा… कोण हे सुधाकर बडगुजर ?

सध्या जिल्ह्यात विकसित भारत संपर्क यात्रा सुरू असून या यात्रेमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती व शेती संदर्भातील प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. या योजनेमध्ये भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे पक्षीय स्तरावर आदेशित करण्यात आले असून या योजनेच्या वेळी स्थानिक पंचायत समिती सदस्य तसेच पक्षीय पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होत असल्याचे एकंदर चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना या जणू आपल्या पक्षामार्फत राबवल्या जात असल्याचे भासाविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी बोईसर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून राज्य सरकारच्या योजना गोरगरिबा पर्यंत पोहोचवण्यासाठी आखणी करण्याचे निर्देशित केले. बोईसर, तारापूर व परिसरात भेडसावणाऱ्या समस्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मांडल्या असत्या. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उदयकुमार आहेर यांनी आश्वासित केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची सर्व कार्यकर्त्यांना जाणीव असल्याचे सांगत भेडसावत असणाऱ्या समस्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू व त्यावर तोडगा करू असे उदयकुमार यांनी या बैठकीत आश्वासित केले.

हेही वाचा… सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात भाजपचाच प्रभाव, शिंदे गटाचे पालकमंत्री दुय्यमस्थानी

नुकत्याच निवडणूक पार पडलेल्या पाच राज्यांपैंकी मध्यप्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यात ‘लाडली बहन’ या योजनेचा मोठा फायदा भाजपला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरीकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा फायदा पक्षाला व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावांत जाऊन कार्यक्रम घेण्याचे आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना आवाहन केले आहे.

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात शासन आपल्या दारी सारख्या भव्यदिव्य शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करून लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचे तंत्र अवलंबिले आहे. यानिमित्ताने संपूर्ण प्रशासन सत्ताधारी पक्षांच्या राजकीय फायद्यासाठी राबवून सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांमार्फत केला जात आहे.

हेही वाचा… रायगडात ठाकरे गटाची भिस्त शेकाप आणि मित्र पक्षांवर

पंतप्रधान किसान सन्मान निधी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक १२ हजार रुपये थेट जमा करीत आहे. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतीराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा योजना या प्रामुख्याने दोन योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याचसोबत पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आनंदाचा शीधा, विश्वकर्मा योजना, एक रुपयांत पीक विमा, उज्ज्वला गॅस योजना, आभा कार्ड, ई श्रम कार्ड, इमारत व बांधकाम कामगार कल्याण योजना, लेक लाडली सारख्या योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेसोबतच पक्षाच्या माध्यमातून गावपाड्यांवर शिबीरे आयोजित केली जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाने सुरवातीपासून आघाडी घेतली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) देखील शासकीय योजनांसोबतच शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या मदतीने आरोग्य शिबीरे आयोजित करीत असून सरकारची कामे आणि योजना थेट नागरीकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षातर्फे शिवदूत नेमण्यात येत आहेत.