विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मध्य प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपाचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलेले काही पक्ष मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी ही लढत काहीशी कठीण होण्याची शक्यता आहे. सध्या तरी इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी (आप), संयुक्त जनता दल (जदयू) आणि समाजवादी पार्टी (सपा) या तीन पक्षांनी काँग्रेसशी जागावाटप होऊ न शकल्यामुळे आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.

आप, सपा आणि जदयू निवडणुकीच्या रिंगणात

विरोधकांची इंडिया आघाडी ही राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरही अस्तित्वात असावी, अशी या आघाडीतील काही घटकपक्षांची भूमिका आहे. भाजपाला पराभूत करायचे असेल तर सर्वसमावेशक विचार करायला हवा, आघाडी विधानसभा निवडणुकांसाठीही हवी, अशी भूमिका समाजवादी पार्टी तसेच अन्य पक्षांनी मांडली आहे. मात्र, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे, अशी भावना काँग्रेसची आहे. याच कारणामुळे सध्या इंडिया आघाडीत मतभेद पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप, सपा आणि जदयू या तीन पक्षांनी मध्य प्रदेशमध्ये ९२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यातील साधारण २६ जागांवर आप आणि समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत; तर तीन जागांवर काँग्रेसला भाजपाव्यतिरिक्त आप आणि जदयू या दोन्ही पक्षांचे आव्हान असेल. त्यामुळे काँग्रेसला काही जागांवर फटका बसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Solapur lok sabha, solapur, political party,
सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी
Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

अनेक जागांवर काँग्रेसचा निसटता विजय

मध्य प्रदेशमध्ये असे काही मतदारसंघ आहेत, जेथे काँग्रेसचा निसटता विजय झालेला आहे. अशाच काहीशा मतदारसंघात समाजवादी पार्टी, जदयू आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेला राजनगर हा मतदारसंघही त्यापैकीच एक आहे. २०१८ साली या जागेवर फक्त ७३२ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. येथे समाजवादी पार्टीने २३ हजार ७८३ मते मिळवली होती. मध्य प्रदेशमध्ये एकूण नऊ असे मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये काँग्रेसचा २०१८ सालच्या निवडणुकीत अगदी कमी मतांच्या फरकाने विजय झालेला आहे.

काँग्रेसला अनेक जागांवर फटका बसणार?

काँग्रेसने २०१८ सालच्या निवडणुकीत ग्वालियर या मतदारसंघात अवघ्या १२१ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. जबलपूर उत्तर मतदारसंघातही काँग्रेसला अवघ्या ५७८ मतांच्या फरकाने विजय मिळाला होता. यावेळी जदयू पक्षाने या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे जबलपूर आणि ग्वालियर या दोन्ही मतदारसंघांत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्य सहा मतदारसंघांमध्येही काँग्रेसला फटका बसू शकतो. यापैकी मैहार हा मतदारसंघदेखील आहे. कारण या जागेवर २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचा अवघ्या दोन हजार ९८४ मतांंनी पराभव झाला होता. याच जागेवर गेल्या निवडणुकीत सपाला ११ हजार २०२ आणि आप पक्षाला एक हजार ७९५ मते मिळाली होती. म्हणजेच सपा आणि आप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले नसते तर मैहार या जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता. सध्याच्या निवडणुकीतही या जागेवर सपा आणि आप पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या जागेवर आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिंगरौली या जागेवरही अवघ्या तीन हजार ७२६ मतांनी काँग्रेसचा पराभव झाला होता. या जागेवर तेव्हा आप पक्षाने आपला उमेदवार उभा केला होता. त्यावेळी आपला एकूण ३२ हजार १६७, तर सपाला एकूण चार हजार ६८० मते मिळाली होती. सध्याच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे येथेही नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सपाने लढवल्या होत्या एकूण ५२ जागा

मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत आप पक्षाने एकूण ७० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सपा पक्षाने आतापर्यंत ४३ उमेदवार जाहीर केले आहेत; तर जदयू पक्षाने एकूण १० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सोमवारीदेखील या पक्षांकडून काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या १९ जागांवर समाजवादी पार्टीने उमेदवार उभे केले आहेत. २०१८ सालच्या निवडणुकीत सपाने एकूण ५२ जागा लढवल्या होत्या. यातील एका जागेवर या पक्षाचा विजय झाला होता. आप पक्षाने एकूण २०८ जागा लढवल्या होत्या. मात्र, एकाही जागेवर या पक्षाला जिंकता आले नव्हते. २०१८ सालच्या निवडणुकीत आपला एकूण ०.६६ टक्के मते मिळाली होती. जदयू पक्षाने २०१८ सालची निवडणूक लढवली नव्हती.

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत वाद

दरम्यान, गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. जागावाटपासाठी या दोन्ही पक्षांत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने उमेदवार उभे न करता काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती; तर इंडिया ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे, हे आम्हाला अगोदरच सांगायला हवे होते. ही बाब आम्हाला माहीत नसती तर आम्ही आमच्या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेसाठी पाठवलेच नसते, अशी नाराजी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती.