Vice President election 2025 Cross Voting Allegations : मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मताधिक्याने पराभव केला. या निकालानंतर क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. यादरम्यान भाजपाच्या तब्बल १२ खासदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूक निकालानंतर ‘आप’चे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांनी ७५२ वैध मतांपैकी ४५२ मते मिळवली. माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीत ३२० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी अपेक्षा इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना ३०० मते मिळाल्याने विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे- या निवडणुकीत तब्बल १५ खासदारांची मते अवैध ठरविण्यात आली आहेत, त्यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप इंडिया आघाडीतील नेते करीत आहेत.
प्रश्न : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या खासदारांनी क्रॉस-व्होटिंग केले असा आरोप होतो आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?
या प्रश्नाला उत्तर देताना आम आदमी पार्टीचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले, “एक महिला खासदार (स्वाती मालीवाल वगळता) आम आदमी पार्टीच्या सर्व १० खासदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीही याची खात्री केलेली आहे. खासदार हरभजन सिंग यांच्या आईची तब्येत ठीक नसतानाही ते मुंबईहून दिल्लीला विमानाने आले होते. खासदार बाबा संत बलबीर सिचेवाल यांनी पंजाबहून दिल्लीपर्यंत कारने प्रवास करून मतदान केले. आमच्या कुठल्याही खासदाराने क्रॉस व्होटिंग केले नाही, त्यामुळे हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे.”
प्रश्न : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाली असं तुम्हाला वाटतं का?
“निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आम्ही आमच्या सूत्रांकडून माहिती घेतली. त्यांनी आम्हाला सांगितले की, इंडिया आघाडीतील एकूण २७ खासदारांनी क्रॉस व्होटिंग करून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, हे खासदार कोणत्या पक्षाचे आहेत, ते आम्ही उघड करणार नाही,” असं संदीप पाठक यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या तब्बल १२ खासदारांनीदेखील क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा केला. भाजपामध्ये सध्या धुसफूस सुरू असून पक्षातील १२ खासदार पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत, त्यामुळेच त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं, असं खासदार संदीप पाठक यांनी म्हटलं आहे.

प्रश्न : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची भूमिका काय होती? पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी खासदारांना काय सूचना दिल्या होत्या?
या प्रश्नाला उत्तर देताना संदीप पाठक म्हणाले, “उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीतील सर्वच खासदारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनाच मतदान करण्याची भूमिका घेतली होती. पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील खासदारांना तशा सूचना दिलेल्या होत्या. निवडणुकीआधी केजरीवाल यांनी रेड्डी यांची भेटही घेतली होती. ही राजकीय लढाई नसून वैचारिक आहे, असं ते म्हणाले होते. पार्टीच्या प्रमुखांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांनाही रेड्डी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते.”
हेही वाचा : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार? ‘ती’ मते कुठे गेली? विरोधकांचा आरोप काय?
प्रश्न : या निवडणुकीनंतर तुम्ही इंडिया आघाडीच्या ऐक्याकडे कसे पाहता? त्यांना काय संदेश द्याल?
“आम आदमी पार्टी सुरुवातीपासूनच भाजपाच्या विचारसणीविरोधात लढत आहे. आमच्या आमदारांना तसेच वरिष्ठ नेत्यांना खोट्या आरोपाखाली अटक केली जाते, तरीही आम्ही अगदी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहोत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची मोट बांधली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून आघाडीतील मित्रपक्ष एकमेकावर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या २७ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं आम्हाला समजलं आहे, त्यावर प्रत्येक पक्षाने विचार आणि चिंतन करायला हवे,” असं खासदार संदीप पाठक यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपाच्या १२ खासदारांनी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत खळबळ उडाली आहे. ते १२ खासदार नेमके कोण आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.