Sanjay Nishad Warns of NDA Split : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मात्र, आता भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये वादाचा नवीन अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष निषाद पार्टीनं राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला संजय निषाद यांच्यासह राष्ट्रीय लोकदल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी व अपना दल (एस) या पक्षांतील नेत्यांची उपस्थिती होती. भाजपाच्या नेत्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्यानं संजय निषाद यांनी संताप व्यक्त केला.
“भाजपानं एक तर त्यांच्या मित्रपक्षांवर विश्वास ठेवायला हवा, नाही तर त्यांच्याबरोबरचे संबंध तोडून टाकायला हवेत”, असा इशाराच संजय निषाद यांनी दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या निषाद यांनी नुकतीच ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भाजपा व त्याच्या एनडीएमधील मित्रपक्षांमधील संबंध आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा केली.
प्रश्न : भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना त्रास देत आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय निषाद म्हणाले, “दिल्लीतील या कार्यक्रमाचं आयोजन निषाद पार्टीनं केलं होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व मित्रपक्षांना आम्ही कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, भाजपाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) समाजाचं प्रतिनिधित्व करणारा ठरला. या कार्यक्रमातून आम्ही फक्त विरोधकांवर टीका केली. कारण- त्यांनी खोट्या पीडीएची घोषणा केली आहे; पण आम्ही त्यांच्या या बनावट मोहिमेविरोधात पाषाणाप्रमाणे खंबीर उभे आहोत. दिल्लीतील मेळाव्याला एवढी गर्दी होईल, याची कुणालाच अपेक्षा नव्हती.”
आणखी वाचा : महायुतीसमोर मराठा आरक्षणाचा यक्षप्रश्न, राधाकृष्ण विखेंनी कसं शोधलं उत्तर?
संजय निषाद पुढे म्हणाले, “भाजपाचे नेते पुढील कार्यक्रमाला नक्कीच हजर असतील, अशी आम्हाला खात्री आहे. दिल्लीतील या मेळाव्यामुळे एनडीएच्या बाजूनं एक मोठं काम साध्य झालं आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पीएडीएच्या नावाखाली विरोधकांनी उत्तर प्रदेशातील जनतेची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही त्यांचा खोटा अपप्रचार खोडून काढणार आहोत. मात्र, भाजपाच्या काही नेत्यांनी स्वतःच्या मित्रपक्षांविरुद्ध बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्रास तर होणारच आहे.”
भाजपामधील घुसखोर नेत्यांमुळेच मित्रपक्षांना त्रास : संजय निषाद
दिल्लीतील कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण न दिल्याची चर्चा रंगल्यानंतर मंत्री संजय निषाद यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं, “दिल्लीतील कार्यक्रमापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आमच्या कार्यक्रमांना ते यापूर्वीही उपस्थित राहिले आहेत; पण हा कार्यक्रम दिल्लीत असल्यानं केंद्रीय अमित शाह आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्याचा आमचा विचार होता. मात्र, त्यांचे इतर कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. गोरखपूरमध्ये मी जे काही बोललो, त्या प्रकरणाला जास्तच महत्त्व दिले गेले. भाजपामधील घुसखोर नेत्यांमुळेच मित्रपक्षांना त्रास होत आहे”, असा आरोप संजय निषाद यांनी केला.
बाहेरून आलेल्या भाजपा नेत्यांमुळे मित्रपक्षांना त्रास : संजय निषाद
संजय निषाद म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले आणि पहिल्यापासून भाजपामध्येच असलेले नेते मित्रपक्षांना कधीच त्रास देत नाहीत. मात्र, बाहेरून भाजपामध्ये प्रवेश केलेले काही घुसखोर नेत्यांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला अपयशाला याच नेत्यांची वक्तव्यं कारणीभूत ठरली. त्यांच्यामुळेच भाजपाला अनेक बालेकिल्ल्यांत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मी कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी अपशब्द वापरलेले नाहीत. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला त्यांच्या लखनऊमधील अधिकृत निवासस्थानी बोलावले, तेव्हा मी तिथे गेलो. त्यांनी मला या नेत्यांबद्दल विचारले आणि लवकरच एक बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं.”

प्रश्न : २०२७ च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना एनडीएमध्ये मतभेद वाढत आहेत. पुढील निवडणुकीपूर्वी हे मुद्दे सोडवले जातील, असं मित्रपक्षांना वाटतं का?
या प्रश्नाचं उत्तर देताना संजय निषाद म्हणाले, “सध्या उत्तर प्रदेशातील एनडीएमधील मित्रपक्षांना एका ‘समन्वयकाची’ गरज आहे. आम्ही प्रत्येक वेळी छोट्या छोट्या कामांसाठी अमित शाह किंवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जाऊ शकत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू होत्या. त्या बैठकीचं आम्हालाही निमंत्रण दिलं जात होतं; पण आता तसं होत नाही. अनुप्रिया पटेल किंवा जयंत चौधरी दिल्लीत राहत असल्याने त्यांच्याकडे पर्याय आहेत. मात्र, आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ताटकळतच राहावं लागतं. मित्रपक्षांना छोट्या छोट्या कामांसाठी संपर्क साधता यावा म्हणून उत्तर प्रदेशमध्ये एक समन्वयक असावा, अशी आमची इच्छा आहे. आमच्या समाजाला काहीही नको; फक्त सन्मान हवा आहे”
हेही वाचा : आयपीएस अधिकारी थेट उपमुख्यमंत्र्यांशी भिडल्या; विरोधकांचा अजित पवारांवर संताप, या व्हिडीओची चर्चा का होतेय?
प्रश्न : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ‘संविधान बचाव’ हा मुद्दा पुन्हा चालेल का?
“विरोधकांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिल्यामुळेच आमच्या पदरी गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मोठं अपयश आलं. अयोध्यासारख्या ठिकाणी काही नेत्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे या मुद्द्याला आणखीनच हवा मिळाली. कदाचित उत्तर प्रदेशातील पुढील निवडणूक ‘संविधान बचाव’ या मुद्द्यावरच होईल. मात्र, आम्ही आता त्यासाठी तयार आहोत”, असं संजय निषाद यांनी स्पष्ट केलं आहे.
इंडिया आघाडीची एकजूट; एनडीएवर दबाव
दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीमध्ये एकजूट ठेवली आहे. देश संविधानावर चालतो… फक्त देवावर नाही. आम्हीही धार्मिक आहोत; पण संविधानिक हक्क हा एक वेगळा विषय आहे, असं इंडिया आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. अनुसूचित जाती (SCs) आणि इतर मागासवर्गीय (OBC) समुदायाला आरक्षणात वाटा मिळाला आहे. अति मागासवर्गीयांना (MBC) सुद्धा त्यांचे संविधानिक हक्क मिळायला हवेत, असा दबावही त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर टाकला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.