कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा डंका पिटला जात असला तरी प्रत्यक्षात गोकुळच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सुरू असलेल्या संपर्क सभेची सूत्रे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे गोकुळचे नेते संघाचा कारभार हाकत आहेत. यामध्ये महायुतीची सत्ता आल्याचा दावा पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेला आहे. विरोधी गटाच्या किल्ला लढवणाऱ्या शौमिका महाडिक यांच्यासह विरोधी गटातून निवडून आलेल्या संचालकांची मात्र भलतीच कोंडी झाली आहे.
राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) संघाकडे पाहिले जाते. या संघाची प्रगती जितकी कौतुकास्पद आहे तितकाच संघातील गैरव्यवहार, भ्रष्ट कारभार अनेक कारणाने चर्चेत राहिलेला. भ्रष्टाचाराच्या तक्रारी वरून अनेकदा गोकुळची चौकशी लागून ताशेरे ओढले गेले. गोकुळच्या अशा चौकशा लागल्या की मलईदार कारभाराच्या जोरावर त्या यथावकाश थांबवण्यात सत्ताधाऱ्यांनी यश मिळवले.
गोकुळ दूध संघात अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने दोन महिन्यापूर्वी राजकीय वारे चांगलेच तापले होते. ही संधी साधत गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत विरोधी गट असलेल्या महाडिक परिवाराने पोहचवली. फडणवीस यांनी मनावर घेतल्याने सतेज पाटील यांनी निश्चित केलेला अध्यक्षपदाचा उमेदवार बाजूला सारला गेला आणि गोकुळचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ या अनुनभवी तरुणाकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. पाठोपाठ गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आल्याचे तावातावाने सांगितले जावू लागले.
गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा पंधरवड्यावर आली असताना दरवर्षीप्रमाणे तालुका निहाय संपर्क बैठका सुरू झाल्या आहेत. मुख्य म्हणजे या संपर्क दौऱ्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे गोकुळचा कारभार कसा आहे याची जंत्री वाचून दाखवत आहेत. हसन मुश्रीफ – सतेज पाटील या दोघा मित्रांकडे संपर्क सभेची आणि गोकुळच्या कारभाराची सूत्रे एकवटल्याचे यातून अधोरेखित होत आहे. सभांमधून सतेज पाटील हे कामगिरीचा आढावा घेताना गेल्या चार वर्षांत गोकुळने शेतकऱ्यांना दूध खरेदी, ठेवी यातील वाढीचा उल्लेख करताना संघाची उलाढाल ४ हजार कोटीवर पोहचल्याची मखलाशी करताना दिसत आहेत.
या साऱ्या घडामोडीतून गोकुळ मध्ये खरेच महायुतीची सत्ता आहे की पूर्वीप्रमाणे असलेली हसन मुश्रीफ – सतेज पाटील या दुकलीची प्रभुत्व कायम आहे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ वरिष्ठांना दाखवण्यासाठी महायुतीची सत्ता आहे की आतून भिन्न पक्षात असलेल्या दोघा मित्रांचे राजकीय संधान कायम आहे, असे चित्र गोकुळच्या राजकारणात सध्या तरी दिसत आहे. यातून गोकुळच्या महायुतीच्या सत्तेला सुरुंग कोण लावत आहे याचा शोध सत्ता आणण्यासाठी धावपळ करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का हाही प्रश्न निर्माण होत आहे.
दुसरीकडे, गेली चार वर्षे विरोधाचा किल्ला लढवणाऱ्या एकहाती लढविणाऱ्या शौमिका महाडिक यांची चरफड वाढली आहे. त्याही संपर्क सभेला उपस्थित राहत असल्या तरी गोकुळचा कारभार चांगला म्हणावा की वाईट या कोंडीत त्या सापडलेल्या आहेत. गोकुळच्या पूर्वीचे नेते महादेवराव महाडिक यांच्या सून व भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी असलेल्या शौमिका महाडिक या गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आली असल्याचा दावा असतानाही सत्ता वर्तुळापासून कोसो दूर राहिल्या आहे. आपलेच दात आपलेच ओठ अशा कात्रीत त्या सापडल्या आहेत. गोकुळच्या मलईदार कारभारावर टीका करणेही अवघड आणि गोकुळचा कारभार चांगला चालला आहे असे म्हणणेही कठीण अशा पेचात त्या सापडल्या आहेत. या सर्व सोयीच्या राजकीय गदारोळात गोकुळ मधील महायुतीची सत्ता असल्याचा दावा पंचगंगेच्या पुरात वाहून गेला आहे.