उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : माजी काँग्रेस नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. सत्यजित हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण त्यांचे मामा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा त्यास विरोध होता. सत्यजित यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ‘ अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा राहतो. चांगले नेते भाजपला हवेच आहेत, ‘ अशी टिप्पणी केली होती. काँग्रेसने सत्यजित यांना उमेदवारी न देता वडिलांना दिल्यावर भाजपने सत्यजित यांना पक्षप्रवेशाबाबत विचारले होते. पण उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत निर्णय न झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने अधिकृत उमेदवारही या ठिकाणी दिलेला नाही.

हेही वाचा… बाळासाहेब ठाकरे हेच सत्ताधारी व विरोधकांचे राजकारणाचे केंद्रबिंदू

भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेनुसार कोणत्याही अन्य पक्षातील नेत्याला उमेदवारी हवी असेल, तर पक्षात प्रवेश देऊन भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढावे लागते. पण आता ते शक्य नसल्याने भाजपचा पाठिंबा हवा असेल, तर सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे यांचा मात्र सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याचे समजते.

हेही वाचा… खासदार-आमदार पुत्राची आमदारकीसाठी लगीन घाई

डॉ. तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगली बांधणी केली असून काँग्रेसला पाठिंबा असलेला काही मतदारवर्ग आहे. सत्यजित हे भाजपमध्ये गेल्यास त्यांना या मतदारांची मते मिळतील का, हा प्रश्न आहे सत्यजित यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंबा हवा असल्यास पक्षात प्रवेश करण्याचा पर्याय भाजपने त्यांना दिला आहे. तेही त्यास अनुकूल असून लवकरच तांबे यांचा भाजपप्रवेश होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe joining bjp soon print politics news asj
First published on: 24-01-2023 at 15:17 IST