अलिबाग: रायगड लोकसभा मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी या निमित्ताने विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहीले जात आहे. त्यामुळे सर्वच आमदारांनी मतांचा जोगवा आपल्या उमेदवारांच्या पदरात पाडण्यासाठी जोर लावला आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी गुहागर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. तर अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि दापोलीत महायुतीचे आमदार आहेत. अलिबाग येथे शिवसेना (शिंदे गट) महेंद्र दळवी, पेण भाजपचे रविंद्र पाटील, श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) च्या आदिती तटकरे, महाड मधून शिवसेना (शिंदे गटाचे) भरत गोगावले, आणि दापोलीतून शिवसेना (शिंदे गटाचे) योगेश कदम आमदार आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लीम फक्त मतदानासाठी; उमेदवारी कुणालाच नाही, का झालं असं?

बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती ३६० अंशाच्या कोनात फिरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. सहयोगी पक्षांशी जुळवून घेणे नेते आणि कार्यकर्त्यांना अडचणीचे जात आहे. अशा वेळी नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे दाखले लोकसभा निवडणूकीच्या प्रचार करवून घेतला जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणूकीचे तह केले जात आहेत.

हेही वाचा : नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने या दोन प्रमुख पक्षांची ताकद दोन गटात विभागली गेली. त्यामुळे दोन्ही गटांना आपले अस्तित्व आणि मतदारसंघावरील ताकद दाखविण्याची संधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने चालून आली आहे. चार महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभा निवडणूकही आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा : मुस्लिमांनी मतदान केले म्हणूनच योगी आदित्यनाथ दोनदा मुख्यमंत्री; टीडीपीच्या उमेदवाराचे वक्तव्य

प्रत्येक आमदारांना आपआपल्या मतदारसंघातून मताधिक्य देणे क्रमप्राप्त असणार आहे. अन्यथा चार महिन्यांनी होणाऱ्या निवडणूकीत त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच जण या लोकसभा निवडणूकीला गांभिर्याने घेतांना दिसून येत आहेत.