गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून तरुण चेहऱ्याला संधी देणार असे सुतोवाच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडून करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट वेगळा झाला. त्यात अहेरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असलेले ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम हे सुद्धा होते. महायुतीत त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्रीपद देण्यात आले. अजित पवार गटाचे ते विदर्भातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आत्राम यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी शरद पवार गट इच्छुक असलेल्या विधानसभा क्षेत्रांची यादी माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. त्यात अहेरी विधानसभेचे नाव होते. त्यानंतर अहेरीतील काही इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा >>> कारण राजकारण: लोढांविरोधात लढण्यासाठी उमेदवाराचा शोध

तेव्हापासून या क्षेत्रातील काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आणि मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांची नावे चर्चेत आहे. अनिल देशमुख यांनी देखील या नावांना दुजोरा दिला होता. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राजकीय दृष्टिकोनातून अहेरी विधानसभेचेने वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती व आघाडीकडून ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.

हेही वाचा >>> मराठा आंदोलकांचा राजकीय नेत्यांना घेराव,शरद पवार यांची गाडी अडवली; अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासमोर घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटात खदखद फूट पडण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. त्यानंतर शरद पवार गटाकडून अतुल गाण्यार पवार यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली. परंतु गेल्या वर्षभरात ते फारसे सक्रिय दिसले नाही. त्यामुळे पक्षात अंतर्गत खदखद आहे. काही स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर ही बाब पोहोचवली असून अहेरी विधानसभेकरिता गण्यार पवार ज्या उमेदवाराचे नाव पुढे करत आहे. त्यालाही त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे कमकुवत दिसत असलेला शरद पवार गट येणाऱ्या विधानसभेला कसे सामोरे जाणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.