कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू उद्योग समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या एकत्र येण्यावरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जवळीक झाल्याचे चित्र असताना दुसरीकडे त्यावरून राजकीय संबंध ताणलेही गेले आहेत. या मनोमिलनावर शरद पवार गटाचे  जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी तोफ डागली आहे. तर पाटील यांचा राग वैयक्तिक कारणातून असल्याचे सांगून बोळवण करण्यात आली आहे. या शेरेबाजीला जन सुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मधुर संबंधाची किनार जोडली गेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनपेक्षित राजकीय वळण लागले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे या कट्टर विरोधकांनी काल हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने गळा मिठी घातली. या दोघांची इतकी जवळीक होईल अशी अपेक्ष स्वप्नातही कोणी केलेली नव्हती. नेतेमंडळी स्वहितासाठी काहीही करतात याचाच हा सर्वोच्च दाखला. नेत्यांसाठी रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यांना याची डोळा दोघांचे आलिंगन पाहण्या वाचून पर्याय राहिला नाही.

या दोघांच्या एकत्र येण्यावरून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या. एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी मुश्रीफ घाटगे  ऐक्यावरून जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यावर मुश्रीफ यांच्याकडूनही काही प्रतिप्रश्न लावले गेले. चंदगड तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा बाभुळकर  व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे एकत्रित आले. तेव्हा पाटील यांना विरोध का सुचला नाही. आता कागल पुरतेच ते का बोलत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.

पाटील यांचे माझ्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांची ती व्यक्तिगत जळजळ असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. शिवाय, चंदगड असो की कागल येथे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येत असताना पाटील यांना पक्षातून कोणी विचारले गेले नसल्याने ते दुखावले गेले आहेत. यातून त्यांचे पक्षातील स्थान ही स्पष्ट होत आहे, अशा खोचक टोला लगावला गेला. पन्हाळा व मलकापूर या पालिकांमध्ये शरद पवार गटाने उमेदवार उभे केलेले नाहीत. याचे कारण सांगताना जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्याकडे संयुक्त राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, आमदार विनय कोरे यांच्या सोयीच्या राजकारणासाठी हा भाग जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला.

येथे पक्ष वाढू दिला नाही, अशी टीका करीत मुश्रीफ आणि कोरे यांची राजकीय सख्य अधोरेखित केले. तथापि, राष्ट्रवादी मध्ये दुभंग झाल्यानंतर पन्हाळा, शाहूवाडी मध्ये पाटील यांना पक्ष वाढवायला कोणी अडवले होते, असा परखड प्रश्न मुश्रीफ यांच्या गोटातून विचारला जात आहे. एकंदरीतच मुश्रीफ घाटगे यांची जवळीक इतर पक्षांवर आणि निवडणूक निकालांवरही परिणामकारक ठरणार असे दिसू लागले आहे.