संतोष मासोळे

दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा धुळे दौरा झाल्याने बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर तो कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांच्या मल्हार बागेला भेट देण्याचे टाळून ऐनवेळी पवार यांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या घराची वाट धरली. पवार यांची ही कृती युवा नेत्याला राजकीय बळ देणारी ठरली आहे.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

भाजप आणि शिंदे गटात जाण्यासाठी राज्यात सर्वत्र चढाओढ लागलेली असल्याने प्रत्येक पक्ष सावधगिरीच्या भूमिकेत आहे. त्यामुळेच राजकीय नेत्यांकडून ग्रामीण भागाच्या दौऱ्यांना वेग आला आहे. शरद पवार यांच्या धुळे दौऱ्यास नूतनीकरण केलेल्या राष्ट्रवादी भवनाच्या उद् घाटनाचे निमित्त असले तरी पक्षात गटतट निर्माण करणाऱ्यांना समज देणे, हा त्यांचा मूळ हेतू लपून राहिलेला नाही. \

शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळून आली आहे. पक्ष कार्यालयाच्या नूतनीकरण कार्यक्रमात सामावून न घेणे, जिल्हाध्यक्षांचे दालन रद्द करून प्रदेश उपाध्यक्षांचे दालन उघडणे, झेंड्याचा स्तंभ उंच करणे, अशी कारणे पुढे करुन पक्षातंर्गत दोन गटात जोरदार भांडण झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी भवनातच अनिल गोटे यांचे समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात ही हमरीतुमरी झाल्याने भविष्यात राष्ट्रवादीच्या वाटचालीबद्दल काही स्थानिक नेत्यांमध्ये चिंता व्यक्त केली गेली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या समोरही गटबाजी उफाळून येते की काय, असे अनेकांना वाटत होते.

अशी गटबाजी पवार यांच्यासमोर झालेली नसली तरी पवार यांनी गोटे यांच्या मल्हार बागेकडे पाठ फिरवून रणजित राजे भोसले म्हणजे पक्षाच्या निष्ठावान आणि सातत्याने सक्रिय राहणाऱ्या कार्यकर्त्याची पाठराखण केल्याचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे प्रदेश उपाध्यक्ष गोटे यांनी पवार यांच्या स्वागतासाठी मल्हार बागेत पूर्वतयारी केली होती. त्यांनी मुख्य कार्यक्रमाचीही रूपरेषा आखली होती. भोसले हे वीस वर्षांपासून पक्षात विविध पदांवर काम करीत आहेत. २००२ मध्ये त्यांनी युवकांचे संघटक म्हणून सूत्रे स्वीकारली आणि पक्षाचे प्रवक्ते, ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष अशी विविध पदे सांभाळली आहेत. ते विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष आहेत.

पक्षातील एकेकाळचे निष्ठावान म्हणवले जाणारे काही जण पक्ष सोडून जात असताना भोसले यांनी दोन वर्षांत पक्षाचे जवळपास ३४२ कार्यक्रम घेतले. नव्या शाखा उघडून पक्ष बळकटीकरणाला चालना दिली. पक्ष कार्यात झोकून देत भोसले यांनी आपली पक्षनिष्ठा अधोरेखित केली. यामुळेच याआधीही खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या पक्ष नेत्यांनी भोसले यांच्या घरी भेट देणे पसंत केले आहे.

शरद पवार यांनी कार्यक्रमस्थळी आसनस्थ होतांनाच भोसले यांना आपल्या जवळची खुर्ची रिकामी करून दिली. जवळ बसून भोसले यांच्याशी पक्षांतर्गत स्थितीची थोडक्यात माहिती जाणून घेतली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री हेमंत देशमुख यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर भोसले यांनी पवार यांच्या जवळून उठून खुर्ची रिकामी करून देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पवार यांनी भोसले यांचा हात धरून आहे तिथंच आपल्या शेजारी बसविले. यानंतर त्यांनी भोसले यांच्याघरी जेवण घेऊन पुढील कार्यक्रमासाठी रवाना होण्याचा कार्यक्रम आखला. पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात पक्षनिष्ठा,सक्रिय कार्यकर्ता यांना नेहमीच राजकीय बळ दिले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांप्रति नेमकी भावना पवार यांनी धुळे दौऱ्यात अधोरेखित केली. अनिल गोटे यांनी रणजितराजे भोसले हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने पवार यांनी त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ऐनवेळी कार्यक्रमात बदल झाला. अन्य मंडळी आपल्याकडे आली होती, असे नमूद करीत गोटे यांनी पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.