राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अरूण लाड यांचे पुत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपने महायुतीतील मित्रपक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाच वर्षाने होणार्या पुणे पदवीधर मतदार संघात शह देण्यासाठी मोर्चेबांधणी आखली आहे. लाड यांच्या भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी क्रांती कारखान्यावर जाउन प्रत्यक्ष बोलणीही केली आहेत. लाड गटाच्या पक्षांतराचा खरा फटका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला फारसा त्रासदायक नसला तरी काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या राजकीय महत्वकांक्षेला वेसन घालणारा ठरू शकतो हे मात्र निश्चित.
आमदार अरूण लाड यांनी विधान परिषदेची निवडणूक गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली होती. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना पराभूत केले होते. या विजयात त्यांना आमदार डॉ. कदम यांचीही साथ मिळाली होती. या निवडणुकीतील रणनीतीची धुरा कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांभाळली होती. नियोजन पूर्वक प्रयत्न केल्याने तत्पुर्वी झालेल्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य दूर करण्यात लाड गटाला यश आले होते.
पुणे पदवीधर मतदार संघावर प्रामुख्याने भाजपचा दावा राहिला होता. मात्र, मिरजेचे प्रा. शरद पाटील यांनी हा दावा मोडीत काढत पुरोगामी विचारांना सोबत घेत भाजपला प्रथम धक्का दिला. यानंतर अरूण लाड यांनी भाजपच्या या मतदार संघावर प्रभुत्व मिळवले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही एकेकाळी या मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. यामुळे हा मतदार संघातील पराभवाचे शल्य दूर करणे हे भाजपचे उदिष्ट आहे. यासाठीची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
गेल्यावेळी एकत्रित असलेल्या राष्ट्रवादीने लाड यांच्या रूपाने या मतदार संघावर विजय मिळवला होता. यामुळे महायुतीमध्ये या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून दावेदारी प्रबळ मानली जात आहे. हे ओळखूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप तथा भैय्या माने यांची या मतदार संघासाठीची उमेदवारीही जाहीर केली असून कोणत्याही स्थितीत ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून लढवली जाईल असे सांगितले आहे.
आमदार अरूण लाड आता निवडणुकीच्या मैदानात उतरतील असे वाटत नाही. कारण त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्तीचा मार्ग आता स्वीकारला असावा. यामुळेच त्यांनी कारखान्याची धुरा पुत्र शरद लाड यांच्याकडे सुपुर्द केली आहे. लाड यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना पक्षाचे प्रतोदपदही सांभाळले असून त्यांनी पक्ष संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. या अनुभवाच्या जोरावर पदवीधर मतदार संघासाठीची त्यांची तयारी सुरू आहे. याचे परिणाम पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघावर निश्चित होणार आहेत.
कारण या मतदार संघात देशमुख आणि कदम यांचे दोन स्वतंत्र राजकीय प्रवाह आहेत. याच मतदार संघाने डॉ. पतंगराव कदम यांनाही पराभूत केल्याचा इतिहास आहे. मतदार संघामध्ये लाड यांचा गट ज्या बाजूला असतो त्या गटाच्या विजयाच्या शक्यता अधिक असते. पदवीधर नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. पुढील वर्षी दिवाळीत ही निवडणुक होणार आहे. मात्र, यासाठी पाच जिल्ह्याचा हा मतदार संघ पिंजून काढणे, मतदार नोंदणी करणे ही कामे करावी लागतील. यात जो अधिक सक्रिय राहील त्याचा विजयाचा दावा प्रबळ असेल. नजीकच्या काळात शरद लाड जर भाजपमध्ये आले तर मतदार संघातील देशमुख आणि लाड एकत्र आल्याने याचा फटका आमदार डॉ. कदम यांना बसू शकतो. भाजपची रणनीती या दिशेने आहे.