संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज आज, सोमवारपासून सुरू झाले असून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधक करत असून केंद्र सरकारही त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांसह भाजपा नेते या चर्चेत सहभागी आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होतील अशी शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह इतर अनेक सदस्य सरकारविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करतील.
महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाने लोकसभेतील चर्चेसाठीच्या प्रवक्त्यांच्या यादीतून शिष्टमंडळातील नेत्यांची नावं वगळली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारतातील काही प्रमुख विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. शिवाय सत्ताधारी पक्षाला यावरून घेरले. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असा प्रचार विरोधी पक्षाने केला. या सगळ्यानंतर केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याचे सत्य आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळांची नियुक्ती केली. यामध्ये सात खासदारांचा समावेश असून त्यांच्या अधिपत्याखाली काही खासदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आणि ८ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांची सात शिष्टमंडळे तयार करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व बैजयंत पांडा (भाजपा), रविशंकर प्रसाद (भाजपा), संजय कुमार झा (जेडीयू), श्रीकांत शिंदे (शिवसेना), शशी थरुर (काँग्रेस) कनिमोझी करुणानिधी (द्रमुक) आणि सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-शरद पवार) यांनी केले. त्यांनी ३२ देशांना आणि बेल्जिअममधील ब्रुसेल्समधील युरोपियन युनियन मुख्यालयाला भेट दिली. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या सात सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे देखील सहभागी होते. शशी थरूर यांच्यावर मोदी सरकारने ही महत्त्वाची जबाबदारी दिली होती.
याचा परिणाम संसदेतील लोकसभेत दिसून आला आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांची नावं शिष्टमंडळात होती आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात केंद्र सरकारचा संदेश पोहोचवला, त्यांना लोकसभेतील चर्चेसाठीच्या प्रवक्त्यांच्या यादीतून वगळले आहे.
“या शिष्टमंडळांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सरकारच्या बाजूने बोलले. आता विरोधक आणि भारतातील जनतेच्या चिंता मांडण्याची वेळ आली आहे, म्हणूनच पक्षाने सभागृहात बोलण्यासाठी नवे लोक निवडले आहेत”, असे एका काँग्रेस खासदाराने सांगितले आहे. या शिष्टमंडळांचा भाग असलेल्या नेत्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. मात्र, सध्या ते दोघेही खासदार नाहीत. असं असताना शशी थरूर, मनीष तिवारी आणि अमर सिंह यांसारखे खासदारही काँग्रेसकडून चर्चेसाठी निवडले गेलेले नाहीत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी करण्याच्या दाव्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चेसाठी प्रत्येकी १६ तास राखीव ठेवले आहेत. लोकसभेत ही चर्चा आज, सोमवारपासून सुरू झाली आहे. तसंच उद्या, मंगळवारी राज्यसभेत या मुद्द्यांवर चर्चा होईल. शिष्टमंडळाच्या यादीवरून काँग्रेस आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. काँग्रेसने सरकारवर स्वस्त राजकारण केल्याचा आरोप केला होता, कारण सरकारने लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई आणि पंजाबचे खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांची निवड केली नव्हती.
काँग्रेस विशेषत: शशी थरूर यांच्या निवडीवर नाराज होती. ते परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय समितीचे प्रमुख असून माजी राजनैतिक अधिकारीही आहेत. काँग्रेसच्या अनेक भूमिकांवर थरूर यांची भूमिका वेगळी असल्याने त्यांची निवड पक्षाला योग्य वाटली नाही. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी निवडलेले वक्ते फारसे प्रसिद्ध नसले तरी ते देशाच्या विविध भौगोलिक भागांचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, हरयाणा, ओडिशा, राजस्थान आणि तमिळनाडूतील निवडणुकांमधून ते खासदार झाले आहेत. “संघर्षाने प्रभावित झालेल्या राज्यांचे प्रतिनिधी निवडण्यात आले होते”, असे एका काँग्रेस खासदाराने सांगितले.
लोकसभेत विरोधी पक्षाकडून गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली. काँग्रेसच्या इतर वक्त्यांमध्ये प्रियंका गांधी वाड्रा (वायनाड), दिपेंद्र सिंह हुड्डा(रोहतक), प्रणिती शिंदे (सोलापूर), सप्तगिरी उलका (कोरापूट) आणि बजेंद्रसिंह ओला (झंझनू) यांचा समावेश आहे. मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राजा वडिंग (लुधियाना), लोकसभा व्हीप माणिकम टागोर (विरूधुनगर) आणि शफी परांबिल (वडकारा) हेदेखील बोलणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर विरोधी पक्षांनीही त्यांच्या वक्त्यांची यादी सरकारकडे पाठवली. तृणमूल काँग्रेसकडून खासदार कल्याण बॅनर्जी आणि सायोनी घोष, समाजवादी पक्षाकडून रामाशंकर राजभर आणि छोटेलाल, द्रमुककडून ए राजा आणि कनिमोई, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून सुप्रिया सुळे आणि अमर काळे चर्चेत सहभागी आहेत.