अलिबाग- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युत्या आघाड्यांसाठी चर्चांना सुरवात झाली असतांनाच रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी पुढाकार देत प्रस्ताव सादर केला आहे. मात्र हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला पचनी पडेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर तोंडसूख घेण्याची एकही संधी सोडत नाही अशी परिस्थिती आहे, यातून वैयक्तीक टिका टिप्पणीही झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट युती होणार नाही अशीच परिस्थिती आहे. मात्र तरिही वाद बाजूला ठेऊन शिवसेना शिंदे गटाने पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप समोर महायुतीचा प्रस्ताव पुढे केला आहे.
अलिबाग येथे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महायुतीसाठी नवीन फॉर्मुला पुढे करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागासाठी निवडणुक होणार आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे. तिथे त्या पक्षाने सात जागा लढवायच्या आहे. उर्वरीत तीन जागा या सामोपचाराने वाटून घ्यायच्या असा प्रस्ताव शिवसेनेनी ठेवला आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. महायुतीच्या या फॉर्मुल्यानुसार शिवसेनेला २१, भाजपला २१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ७ जागा येणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्विकारला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण मागील निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. कर्जत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस मान्य करणाची शक्यता फारच कमी असणार आहे.
पाली नगरपंचायत पॅटर्नची चर्चा…
नुकत्याच झालेल्या पाली नगर पंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेत, भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचे पराग मेहता विजयी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला दूर ठेऊन युती करण्याची खेळी खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे जिल्हा संघटक सतीश धारप खेळू शकतात अशी चर्चा सुरू आहे.