जळगाव : जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेतील घवघवीत यशानंतर महायुतीचे घटकपक्ष भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी महाविकास आघाडीचे बरेच पदाधिकारी काही दिवसांपासून इच्छुक आहेत. मात्र, संबंधितांकडून अद्याप कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ‘ऑपरेशन टायगर’ प्रारंभ करतानाच एरंडोल तालुक्यातील अनेक पदाधिकारी गळाला लावून ठाकरे गटाला हादरा दिला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विशेषतः शिवसेनेत (एकनाथ शिंदे) दुसऱ्या पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत असली, तरी जळगाव जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या लक्षणीय राहिली आहे. भाजपमध्ये सक्रीय होण्याच्या उद्देशाने पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ तसेच अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गेल्याच महिन्यात जामनेर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. मात्र, दोघांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली असल्यामुळे त्यांना अद्याप प्रवेश देण्यात आलेला नाही. अशाच प्रकारे अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. परंतु, त्यांच्या प्रवेशाला अजुनही हिरवा झेंडा मिळालेला नाही. इतरही अनेक पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याच्या बाबतीत दोन्ही पक्षांकडून काहीसा सावध पवित्रा घेण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत एरंडोल तालुक्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश देऊन भाजपसह अजित पवार गटावर मात केली आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्यांमध्ये ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल महाजन, युवासेना शहर प्रमुख जयेश महाजन, युवासेना शहर संघटक नितीन महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी आदींचा समावेश आहे.