जालना – काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरुन महाविकास आघाडीतील कॉग्रेस आणि शिवसेना (उध्दव गकरे) पक्षाच्या जिल्हयातील प्रमुख नेत्यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे महायुती मधील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जिल्हयातील प्रमुख नेत्यांनीही गोरंट्याल यांना सवाल केला आहे.
शिवसेनेचे जिल्हयातील प्रमुख नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी गोरंट्याल यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याचा संदर्भ येऊन खोतकर म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह असणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा गोरंट्याल यांनी आपल्यावर गद्दार म्हणून आता टीका केली होती.
आपण तर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता तर गोरंट्याल यांनी ज्या काँग्रेस पक्षाकडून तीन वेळेस आमदारकी उपभोगली त्या पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसमध्ये अनेक पदे उपभोगून भाजप सोबत जाण्याचा गोरंट्याल यांच्या निर्णयाला गद्दारी नाही तर काय म्हणावे ? पूर्वर्वीपासूनच गोरंट्याल यांचे भाजपशी संबंध ‘अनैतिक ‘ संबंध होते. आता त्यांनी भाजपशी उघड ‘घरोबा’ केला आहे, अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हा प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे की, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरंटयाल यांनी भाजप प्रवेश केला आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या परंपरागत आणि भाजप विरोधात असणाऱ्या मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही. जालना शहरातील मतदारांची संख्या जवळपास दोन लाख पस्तीस हजार असून त्यापैकी किमान चाळीस टक्के मतदार परंपरागतरित्या भाजपला मतदान करणारे नाहीत.
मुस्लिम, दलित, ख्रिश्चन इत्यादी समाजातील या मतदारांपैकी बहुतेक मतदार कॉग्रेसचे पाठिराखे मानले जातात. वेळप्रसंगी यापैकी अनेक मतदार अपक्ष किंवा अन्य पक्षाला मतदान करतात परंतु भाजपला मतदान करीत नाहीत असा यापूर्वीच्या अनेक निवडणुकीतील अनुभव आहे. गोरंट्याल यांच्या पक्ष बदलामुळे त्यांना वैयक्तिक मानणारे मतदार सोबत जातील किंवा भाजपचे मतदार त्यांच्याकडे वळतील परंतु काँग्रेसच्या अल्पसंख्यांक समाजाच्या मतावर परिणाम होणार नाही, असे अंबेकर म्हणाले. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे म्हणाले.
गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर टीका करताना पक्षाने सर्व कांही देऊनही त्यांनी घेतलेला निर्णय दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने गोरंट्याल यांना सहा वेळेस विधानसभेची उमेदवारी दिली. त्यापैकी तीन वेळेस ते निवडून आले. काँग्रेसमुळे ते जालना शहराचे नगराध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नी संगीताताई गोरंट्याल यांनाही काँग्रेस पक्षामुळे जालना शहराचे नगराध्यक्ष मिळाले. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत गोरंट्याल यांना उपाध्यक्षपदासारखे महत्वाचे पद देण्यात आले होते. असे असतानाही सध्याच्या देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरणात त्यांचा भाजप प्रवेश चुकीचा असल्याचे खासदार काळे यांनी म्हटले आहे.