महेश सरलष्कर

कधीकाळी पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदींचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले गेलेले शिवराजसिंह चौहान पुन्हा लोकसभा निवडणुकीत उतरून राजकारणातील तिसरा डाव मांडत आहेत. त्यातून त्यांच्या हाती नेमके काय लागणार हा प्रश्न असला तरी लोकांमधून आलेला नेता कधी खेळ अध्र्यावर सोडून जात नाही. मोदींच्या स्पर्धेत शिवराजसिंह आता कुठेही नाहीत, तरीही त्यांनी लढणे सोडलेले नाही.

संघ-भाजपचा बालेकिल्ला मानला गेलेला मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघात शिवराजसिंह पुन्हा आलेले आहेत. त्यांना ही निवडणूक खरोखर लढायची होती की, त्यांना लढवायला लावली हे भाजपचे पक्षश्रेष्ठीच सांगू शकतील. २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा होत होती. पण पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावली. मग गडकरींनी दिल्लीत कार्यक्षम मंत्री असल्याचा दबदबा निर्माण केला. तसे विदिशामधून शिवराजसिंह जिंकले तर त्यांनाही दिल्लीत यावे लागेल. मंत्रीपद मिळाले तर ते मोदींच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री असतील. तेही नाही मिळाले तर भाजपचे एक खासदार एवढीच त्यांची ओळख उरेल.

शिवराजसिंह चौहान संघाच्या शिस्तीत वाढलेले मुरब्बी भाजप नेते आहेत. २००३ पासून २० वर्षे शिवराजसिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होण्याआधी त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा विचार दिल्लीतून होत असल्याचे बोलले गेले. पण शिवराजसिंहांनी ‘लाडली बेहना’ योजना सुरू करून राजकीय स्पर्धकांवर तात्पुरती का होईना मात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अभूतपूर्व यश मिळवले, पण मुख्यमंत्री पदाची माळ मोहन यादव या नवख्याच्या गळय़ात पडली.

शिवराजसिंह यांनी पहिली विधानसभा निवडणूक बधुनीमधून लढवली होती. बधुनीने त्यांना कधीही निराश केले नाही. या वेळीही शिवराज बधुनीमधून आमदार बनले आहेत. आताही लोकसभेची निवडणूक ते इथूनच लढवणार आहेत. बधुनी विधानसभा मतदारसंघ विदिशा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. विदिशामधून एकेकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी निवडून आले होते. त्यांचा वारसा चौहानांनी चालवला. १९९१ पासून शिवराजसिंह विदिशामधून सलग पाच वेळा खासदार झाले.

आता दोन दशकांच्या मोठय़ा मध्यंतरानंतर शिवराजसिंह लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजय मिळाला तर ते दोन्ही काळांतील भाजपला जोडणारा दुवा ठरू शकतील.