Shiv Sena protest India Pakistan match आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना (India vs pakistan match) होणार आहे. याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलनाविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शिवसेनेच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यातील एका फोटोचीही चर्चा होत आहे. या फोटोत खासदार श्रीकांत शिंदे, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आमदार झीशान सिद्दिकी क्रिकेट स्टेडियम मध्ये बसून असल्याचे दिसत आहे.

मुख्य म्हणजे, अगदी सुरुवातीपासून शिवसेनेने भारत-पाकिस्तान सामन्यांना विरोध केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा भारत-पाक सामन्याला विरोध होता. नेमक्या या तणावाचे कारण काय? भारत-पाकिस्तान सामन्याने राज्यातील वातावरण इतके का तापले आहे? भाजपावर ठाकरे गटाचे आरोप काय? यापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही शिवसेनेने अशीच आक्रमक भूमिका घेतली होती का? जाणून घेऊयात…

संजय राऊत यांचा आरोप

“अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जातोय हे लोकभावनेच्या विरुद्ध आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी भारत-पाकिस्तान सामना खेळण्याच्या निर्णयावरुन आक्षेप घेतला. “२६ निरपराध लोक पहलगाम हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश अजूनही संपलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असे सांगितले जात आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडू असा पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे ते म्हणाले आणि आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. “विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे याबद्दल काय म्हणणे आहे ते सांगावं?” असाही प्रश्न राऊत यांनी केला.

‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन

सामन्याच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन केले जाणार आहे. “१४ सप्टेंबरला शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंकू, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवणार आहेत”, असे त्यांनी सांगितले. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही.”

“भारत पाक सामना होणार नाही असा बाळासाहेब म्हणाले होते. ज्यांनी मैदान उखडलं ते सुद्धा शिंदे गटात आहेत. भारत-पाकिस्तान मॅचच्या दरम्यान मोठे गॅम्बलिंग हे गुजरात आणि उत्तरेतल्या राज्यात होत आहे. त्यासाठी हा सामना खेळवला जातोय,” असा आरोपही राऊतांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी खणली होती वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी

पाकिस्तानबरोबर क्रिकेट न खेळणे ही बाळासाहेबांची आणि परिणामी शिवसेनेची फार जुनी भूमिका राहिली आहे. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भारत- पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध दर्शवला होता. त्यावेळी शिशिर शिंदे हे काही कार्यकर्त्यांसह वानखेडे स्टेडियममध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उखडून टाकली.

ते यावरच थांबले नाही. त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑईलही टाकले. त्यामुळे हा सामनाच रद्द करावा लागला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांनी खेळपट्टी उखडल्याचे जाहीर केले होते. मात्र खेळपट्टी खणली तरी सामना होणारच अशी भूमिका सरकारने घेतली होती. असे असले तरीही खड्ड्यात इंधन टाकल्याने खेळपट्टीचे नुकसान झाले आणि सामना रद्द झाला.