छत्रपती संभाजीनगर : ‘मीच पालकमंत्री’, असा दावा करत समजाकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पुढील काही दिवसात जमीन हडप करण्याचे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. त्याच बरोबर गेल्या सहा महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे पुन्हा नव्याने नियोजन केले जाईल. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या अनुषंगाने बैठक घेतली जाईल, असे शिरसाट यांनी आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होता. त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळातील चुकीची दुरुस्ती हाती घेतली जाईल असे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यात अवैघ धंदे, जमीन बळकावण्याचे प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाढले होते. त्याला आता चाप लावला जाईल. अशा प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल असेही मंत्री शिरसाट म्हणाले. जिल्हा नियोजन समितीचा बहुतांश निधी सिल्लोडमध्ये वळविण्यात आला होता. तो समान पद्धतीने वितरित केला जाईल का, असे प्रश्न विचारले जात होते. सरकारचा कोणताही निधी वाया जाणार नाही, अशा पद्धतीने खर्च होईल. तो नियमबाह्यपणे कोणाला वापरता येणार नाही. त्यात काही दोष असतील तर ते दुरुस्त करण्यात येतील, असे सांगत शिरसाट यांनी माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीतील चुकांची दुरुस्ती केली जाईल असे म्हटले आहे. पालकमंत्री मीच असे म्हणत त्यांनी भाजपलाही डिवचले असल्याचे मानले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपाकडे रहावे अशी मागणी केली जात होती. त्यावर शिरसाट यांनी दावा केला आहे.

हेही वाचा :डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजपा दोघेही दुटप्पी; दलितांच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष उदासीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्सा जोग येथे भेट देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आपण जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला. परभणी येथेही ते जाणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर समाजकल्याण मंत्रीही दोन्ही ठिकाणी भेटी देणार आहे. या प्रकरणाचे अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षातील माजी पालकमंत्र्यांच्या कारभारावर समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने येत्या काळात त्याचे राजकीय पडसाद उमटतील असे सांगण्यात येत आहे.