सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील पक्षाच्या मेळाव्यात पक्षाच्या एकीचे नव्हे तर बेकीचेच दर्शन घडले. त्याची लक्षणे सकृतदर्शनी दिसत असल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोसावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
सुनील तटकरे हे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोलापुरात आले होते. तसे पाहता पक्षाला यापूर्वीच गटबाजीचा मोठा फटका बसून विधानसभा निवडणुकीत हक्काच्या एकाही जागेवर आमदार निवडून आला नव्हता. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन स्वतंत्र पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा दुफळी कायम असल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या ‘निर्धार नवपर्वा’ च्या निमित्ताने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तटकरे हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा आटोपून पश्चिम महाराष्ट्रात, सोलापुरात आले होते. परंतु इकडे शहरी आणि ग्रामीण असा सवतासुभा करून दोन स्वतंत्र मेळावे आयोजित केलेले आणि त्यातून एकमेकांच्या विरोधात तक्रारी आणि गा-हाणी ऐकण्याची वेळ तटकरे यांच्यावर आली.

विशेषतः जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यातील या संघर्षाच्या भूकंपाचा केंद्रबिंदू मोहोळ तालुका असल्याचे दिसून आले. उमेश पाटील हे ज्या मोहोळ तालुक्यातून येतात, त्याच तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.‌ परंतु दोन्ही पाटलांमध्ये कधीही पटले नाही. दोघेही एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसल्या आहेत.‌ त्यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ राखीव मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाची हक्काची जागा असून ती उमेश पाटील यांनी उघडपणे राजन पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे यांना निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. परंतु एवढे सारे होऊनही पुन्हा अजित पवार यांनी त्याच उमेश पाटील यांना थेट पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले.‌ निदान त्यानंतर तरी जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश पाटील यांनी झाले गेले विसरून पुन्हा राजन पाटील यांना सोबत घेणे अपेक्षित होते. ‘आले तर सोबत, नाही तर त्यांना सोडून ‘ अशी भूमिका घेतल्याने राजन पाटील आणखी दुखावले.‌ खरे तर त्यांच्यातील संघर्ष अजित पवार यांनी मिटवायला हवा होता.‌

या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या सोलापूर शहरातही हस्तक्षेप करू लागल्याने तेही दुखावणे स्वाभाविक होते. त्यातून त्यांनी उमेश पाटील यांना शह देण्यासाठी राजन पाटील यांची साथ घेतली.‌ सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन्ही गटांच्या मेळाव्यात राजन पाटील हे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे होते.‌ यातून प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना पक्षातील सवतासुभा पाहायला मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे माढ्याचे बडे, साखर सम्राट, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी आपले पुत्र रणजित शिंदे आणि धाकटे बंधू, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे हे दोघांनाही मोहिते-पाटील विरोधात अजित पवार यांनी मोठी ताकद दिली होती. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यात राजकीय वारे वाहू लागताच दोघे शिंदे बंधू एकाच वेळी अजित पवारांची साथ सोडली.‌ बबनराव शिंदे यांनी तर शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी बारामती आणि दिल्ली वारी केली होती. परंतु तिकडे डाळ न शिजल्यामुळे अखेर दोघे शिंदे बंधुंनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. अर्थात, दोघेही शरद पवार गटाकडून दोघेही पराभूत झाले. इकडे माढ्यातून अजित पवार गटाने माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांना उमेदवारी दिली. त्यांना अवघी अवघी १३ हजार ३८१ मते पडली होती. काँग्रेसचे माजी आमदार ॲड. धनाजी साठे यांच्या स्नुषा असलेल्या ॲड.‌मीनल साठे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात फिरकत नाहीत. जिल्ह्यात मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन हक्काच्या जागा अजित पवार गटाने गमावल्या. या पश्चात माढा आणि करमाळ्यात पक्षाची ताकद क्षीण झाली आहे.‌ आगामी काळात या दोन्ही तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार की ठराविक व्यक्तींभोवतीच पक्षाची फरफट होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. खरेतर विधानसभा निवडणुकीपासून पक्षाने योग्य धडा घेणे अपेक्षित होते. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरही पक्षात कुरघोड्याच पाहायला मिळणार असतील तर जिल्ह्यात या पक्षाला भवितव्य काय, याची प्रश्नार्थक चर्चा होत आहे.