भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे.

बीसीसीआयने सौरव गांगुलीची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष असतील. सचिव जय शहा त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. ऑक्‍टोबर २०१९ मध्ये अध्यक्ष बनलेल्या गांगुलीची इच्छा होती की, त्यांनी आणखी एकदा संधी मिळावी. पण, हे होऊ शकले नाही. त्याला संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध करण्यात आला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

सौरभ गांगुलीच्या अध्यक्षदावरून पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सौरभ गांगुलीने भाजपाला नाही म्हणण्याची किंमत भोगावी लागत आहे, असा आरोपही या पक्षांकडून होत आहे.

हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडोपूर्वी ‘या’ पाच पदयात्रांनी घडवली राजकीय क्रांती

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली. या निवडणुकीपूर्वी भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उतरवण्यास तयारी केली होती. मात्र, गांगुलीने राजकारणात पाऊल ठेवलेच नाही.

त्यात आता गांगुलीच्या जागेवर रॉजर बिन्नींचे नाव समोर आल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, बीसीसीआय जय शाहांना सचिवपदावर कायम ठेऊ शकते. मात्र, गांगुलीची उचलबांगडी करण्यात येते, अशी टीका कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) आणि काँग्रसने भाजपावर केली आहे.

हेही वाचा – अचलपूर-परतवाड्यात पुन्हा धार्मिक विद्वेषाचे निखारे

याप्रकरणावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “भाजपात प्रवेश करण्याबाबत सौरव गांगुलीशी चर्चा करण्यात आली होती. पण, गांगुलीने त्यास नकार दिला. २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपाने गांगुलीच्या नावाचा वापर केला. मग, गांगुलीला दुसऱ्यांदा बीसीसीआयचा अध्यक्ष का? बनवलं जात नाही. भाजपा सौरव गांगुलींचा अपमान करत आहे,” असा आरोपही घोष यांनी केला.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत गांगुलीला भाजपा आणि तृणमूल कडून पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रचंड राजकीय दबाव होता. त्यामुळे गांगुलीने राजकारणापासून चार हात दूरच राहण्याच्या निर्णय घेतला. पण, विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभवाचा सामना करावा लागल्याने गांगुली तृणमूल काँग्रेसच्या जवळ गेल्याचं सांगितले जाते.

हेही वाचा – ८९ वर्षांच्या देवेगौडा यांचे राजकारणात कमबॅक…

गांगुलीच्या जवळील व्यक्तीने सांगितले की, “तृणमूलबरोबर गांगुलीचे असलेले संबंध भाजपाला पसंत नव्हते. या कारणामुळेच त्याला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्यात आलं.” मे महिन्यात अमित शाह यांनी सौरव गांगुलीच्या घरी भेट दिली होती. यावेळी जेवणाचा आस्वादही शाहांनी घेतला होता. त्यामुळे गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होते. मात्र, काही दिवसांनी गांगुलीने नबन्ना येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. तसेच, तृणमूलने आयोजित केलेल्या ‘युनेस्को धन्यवाद रॅली’तही तो सहभागी झाला होता. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

भाजपा नेते समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं, “गांगुलीचे नाव राजकारणात ओढून विरोधी पक्ष त्याचा अपमान करत आहे.” तर, गांगुलीची भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( आयसीसी ) अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोप करण्याची ही वेळ नाही आहे, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

हेही वाचा – अमित ठाकरे यांच्यासमोर शिकवणी वर्गाच्या भरमसाठ शुल्काचा प्रश्न चर्चेत ; मराठवाड्यातील विद्यार्थ्यांशी मनसे संवाद

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार अधीर रंजन चौधरी इंडियन एक्सप्रेसला बोलताना म्हणाले, “जय शाहला पुढे आणण्यासाठी सौरव गांगुलीला बाजूला करण्यात येत आहे. बीसीसीआयमधील गांगुलीची प्रतिमा जय शाहांपेक्षा चांगली आहे. त्यामुळेच सुडबुद्धीने त्याला बीसीसीआयमधून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. गांगुली हा बंगालचा नाहीतर देशाचा अभिमान आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘कूलिंग ऑफ पीरिअड’ वाढवण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे सौरव गांगुली आणि जय शाहांना आपल्या पदावर आणखी ३ वर्ष कायम राहता येणार होते.