RJD defections Bihar पाटण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. राज्यासाठी १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होईल. राज्यात सत्तेत असताना राष्ट्रीय जनता दल आणि भ्रष्टाचार याचे नाते सामान्यांनाही माहीत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी गयाजी येथील सभेत केली. गयाजी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी खुल्या वाहनातून दाखल झाले. त्यांच्या समवेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे होते. मात्र, या सभेची चर्चा एका वेगळ्या कारणामुळेही होत आहे. या सभेत पंतप्रधान मोदींबरोबर मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) दोन आमदारदेखील उपस्थित होते, त्यामुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

निवडणुकीपूर्वी पक्षांतर होणार?

  • मोदींच्या सभेत मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नवादा आणि राजाउली मतदारसंघाचे दोन आमदार उपस्थित होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.
  • या सभेत नवादाच्या आमदार विभा देवी आणि राजाउलीचे आमदार प्रकाश वीर हे मंचावर शेवटच्या रांगेत बसलेले दिसले.
  • सध्या आरजेडीमध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याच्या आणि नेत्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांदरम्यान दोन आमदारांच्या उपस्थितीने खळबळ उडाली आहे.
सध्या आरजेडीमध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याच्या आणि नेत्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विभा देवी यांचे पती राज बल्लभ यादव माजी आमदार आहेत. त्यांची नुकतीच पटना उच्च न्यायालयाने पॉक्सो प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे आणि त्यांचा नवादा जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. सूत्रांनी सांगितले की, गेल्या वर्षी आरजेडीने कुटुंबातील सदस्याला लोकसभेचे तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज होते. त्यानंतर त्यांचे भाऊ बिनोद यादव आरजेडीमधून बाहेर पडले आणि नवादा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. दरम्यान, राजाउलीच्या राखीव जागेवरून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश वीर यांचे पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपा प्रवेशाबाबत आमदारांचे म्हणणे काय?

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दोन्ही आमदारांनी आरजेडी सोडून भाजपामध्ये जाण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले. प्रकाश वीर म्हणाले, “या केवळ अफवा आहेत. हा कार्यक्रम बिहारसाठी १३,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी होता. हा पंतप्रधानांचा कार्यक्रम होता, एनडीएची बैठक नव्हती. पंतप्रधान हे सर्वांचे नेते आहेत. या कार्यक्रमात या भागातील सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते आणि मलाही निमंत्रण मिळाले होते, त्यामुळेच मी कार्यक्रमात सहभागी झालो. मी त्याच पक्षाबरोबर आहे, ज्याच्याबरोबर मी नेहमी राहिलो आहे. या सर्व चर्चा चुकीच्या आहेत,” असे ते म्हणाले.

विभा देवी यांनीही असेच मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “हा एक सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाल्यामुळे मी गेले होते, याशिवाय दुसरे काहीही नाही.” आमदारांच्या पक्षांतराच्या शक्यतेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष मांगनी लाल मंडल यांनी या वृत्तांना कमी महत्त्व दिले. “आमच्या पक्षातून ७८ सदस्य निवडून आले होते. चार आधीच वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून निघून गेले. आता आणखी दोन गेले, त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्यांचे पती निर्दोष सुटले, हे सरकारची व्यवस्था आणि पुरावे गोळा करण्यात अपयश आल्यामुळे झाले,” असे ते म्हणाले.

“जे गेले आहेत, त्यांचे काहीच महत्त्व नाही. आम्ही त्यांना तिकीट दिले, ते आमच्या पक्षाच्या तिकिटावर जिंकले. जागा आमचीच आहे, मतदार आमचेच आहेत आणि आमचा उमेदवार तिथे जिंकेल. जो कोणी गेला आहे, त्याचा आमच्या पक्षावर किंवा आमच्या कल्याणावर काहीही परिणाम होत नाही. कोणतीही कारवाई केली जाणार नाही. जे गेले आहेत, त्यांना तिकीट मिळणार नाही,” असे मंडल म्हणाले. आरजेडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, पक्षाने अद्याप कोणताही हकालपट्टी करणारा आदेश जारी केलेला नाही किंवा आमदारांविरोधात कारवाईची मागणी केलेली नाही.

आपल्या सभेत मोदी काय म्हणाले?

विरोधी इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना तसेच घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कारागृहातून सरकार चालविण्याचे प्रकार घडत आहेत. केंद्र सरकारने या आठवड्यात संसदेत जे १३० वी घटनादुस्ती विधेयक सादर करण्यात आले, त्याचा संदर्भ पंतप्रधानांनी भाषणात दिला. आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, हे गेल्या सरकारच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेत वेगळे चित्र आहे, अशीही टीका त्यांनी केली. राज्यात सत्तेत असताना राष्ट्रीय जनता दल आणि भ्रष्टाचार याचे नाते सामान्यांनाही माहीत आहे, अशीही टीका पंतप्रधानांनी केली.

या सभेत बोलताना घुसखोरांमुळे असणाऱ्या धोक्याचा मुद्दा स्वातंत्र्यदिनीही उपस्थित केला होता हे नमूद करत बिहारमधील मतदार याद्यांच्या तपासणीचा अप्रत्यक्ष संदर्भ पंतप्रधानांनी दिला. घुसखोरांना देशातील सुविधांचा फायदा मिळता कामा नये, यासाठीच आपण विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. परंतु, काँग्रेस आणि आरजेडी त्यांच्या मतपेढीच्या राजकारणासाठी या घुसखोरांना वाचवू इच्छितात, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.