गेल्या २५ वर्षांत काँग्रेस पक्षाकडून १९९८ आणि २००३ साली अनुक्रमे पंचमढी आणि शिमला येथे अधिवेशन घेण्यात आलं. या दोन्ही अधिवेशनात युती करण्याबाबत काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या भूमिका अगदी परस्परांच्या विरूद्ध होत्या. अशीच संभ्रमावस्था नुकत्याच उदयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात दिसून आली. सध्या कॉंग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्या कमकुवत झाल्याचं पहायला मिळत आहे. अशा वेळी भाजपाच्या विरोधात इतर विरोधी पक्षांची मोट बांधण्यापूर्वी कॉंग्रेसनं आपली जुनी ताकद पुन्हा मिळवणं अत्यंत आवश्यक असल्याचं कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. कॉंग्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसचा भर पक्षबांधणीवर!

भाजपा विरोधी इतर पक्षांना एकत्र करण्याच्या भूमिकेबाबत खरगे म्हणाले की “आता सर्व प्रथम आपल्याला आपले घर मजबूत करायचे आहे. यासोबतच पक्षातील लोकांना सक्रीय करून ताकदवान बनवावं लागणार आहे. जर तुमच्याकडे स्वत:ची कुठलीही गुंतवणूक नसेल तर कोण तुमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असेल? त्यामुळे आधी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायाचा आहे, मग दुसऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार करू”. ते पुढे म्हणाले की “जो कुणी आमच्या विचारांना साथ देण्यास तयार होईल त्याच्यासोबत जाण्याचा आम्ही विचार करू. पण सध्या मात्र आमचं संपूर्ण लक्ष हे पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते मजबूत करण्यावरच असेल. स्थानिक पातळीवर पक्ष बांधणी करण्यावर आमचा भर असेल”.

पंचमढीतील चिंतन शिबिरात स्वबळावर चर्चा

याआधी १९९८ साली पंचमढी येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात स्वबळाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. “स्वबळावर सरकार स्थापन करताना येणाऱ्या अडचणी या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील एक टप्पा आहे”, असं यावेळी सांगण्यात आलं होतं. तसेच. यावेळी असंही स्पष्ट करण्यात आलं होतं की, “जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच युतीचा विचार करण्यात येईल. मात्र युती करताना पक्षाच्या विचारसरणीशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. असा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही ज्याने पक्ष कमकुवत होईल”. याउलट अवघ्या पाच वर्षांनंतर शिमला येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसकडून थेट धर्मनिरपेक्ष शक्तींसोबत जाण्याचे सूतोवाच देण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही अधिवेशानात कॉंग्रेसनं त्यांच्याच भूमिकेच्या परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरात पक्ष मजबुतीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यापुर्वीच्या चिंतन शिबिरांचा अनुभव बघता हा निर्णय पक्षाकडून किती दिवस पाळला जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.